श्री मंगळग्रह मंदिराविषयी
अमळनेरचे श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे संपूर्ण भारतातील मंदिरांपैकी एक प्राचीन व दुर्मिळ असे जागृत देवस्थान आहे. मंदिर कोणी व कधी बांधले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. परंतू काहींच्या मते 1933 मध्ये प्रथमतः मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. 1940 नंतर मंदिर पुन्हा एकदा विस्मृतीत जाऊन जीर्णावस्थेत पोहोचले. जीर्णावस्थेत गेल्यानंतर 1999 पर्यंत मंदिराचा परिसर शहरातील कचऱ्यासाठी डंपिंग ग्राउंड म्हणून वापरला जात होता. तसेच हा परिसर अगदी स्मशान शांतता असणारा परिसर असल्याने येथे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जुगार तसेच दारूचे अड्डे चालवीत असल्याचे सांगितले जाते. ही वस्तुस्थिती अविश्वसनीय वाटत असली तरी दुर्दैवाने सत्य आहे. परंतू 1999 नंतर मंदिराचे नूतनीकरण करण्यास सुरुवात झाली आणि मंदिर आणि त्याच्या परिसरात चमत्कारिकरीत्या आनंददायी परिवर्तन घडवून आले. गेल्या 5 ते 7 वर्षात या ठिकाणच्या विकासाचा वेग अनेक पटींनी वाढला आहे. सद्या मंगळदेव ग्रह मंदिर हे एक अतिशय प्रसिद्ध आणि अविस्मरणीय देवस्थान म्हणून नावलौकिकास येत आहे.
अभिषेक
लग्न कुंडलीमध्ये मंगळ दोष असलेल्या प्रत्येक उपवर व उपवधू येथे येऊन मंगळाची पूजा व अभिषेक करीत असतात. साधारणतः अभिषेक हा मंगळवार या मंगल दिवशी करण्यास प्राधान्य असते. त्यामुळे मंगलदोष नाहीसा होऊन लग्न कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. अभिषेक करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अथवा प्रत्यक्ष मंदिरात भेट देऊन नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी केलेल्या यजमानांचाच अभिषेक केला जातो. अभिषेक साठी लागणारे संपूर्ण आवश्यक साहित्य मंदिर व्यवस्थापनाकडून पुरविले जाते, घरून कोणत्याही प्रकारचे साहित्य आणण्याची आवश्यकता नसते. अभिषेकासाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केलेली असून एका वेळी शेकडो भाविक पूजेसाठी बसतात. साधारणपणे मंगळ दोष निवारणासाठी केल्या जाणाऱ्या अभिषेकाची पूजा १ तासांपर्यंत चालते.

अभिषेक केल्यानंतर प्रत्येकास प्रसाद म्हणून एक श्रीफळ (नारळ) दिले जाते. ते श्रीफळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या आत उजवीकडे बांधून ठेवावे. आपणास वाटेल तितक्या दिवस ते नारळ आपण घरात ठेऊ शकतात. आपणास वाटेल त्यावेळी ते श्रीफळ आपण वाहत्या पाण्यात विधिवत विसर्जित करू शकतो.
पर्यटन
मंदिर परिसरात एक प्रशस्त व रमणीय बाग आहे, त्या बागेस तुळसाई बाग नावाने देखील ओळखले जाते. बागेत भगवान श्रीकृष्णाची एक मूर्ती स्थापित केलेली असून सभोवताली रोषणाई केलेला एक प्रेक्षणीय कारंजा आहे. परिसरात पाणी साठवण्यासाठी सहा बंधारे बांधलेले आहेत. मंदिरातच दोन मोठे हॉल असून एक भव्य प्रसादालय आहे. येथे नाममात्र वर्गणी घेऊन दररोज येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली जाते.
मंदिराच्या समोरच एक रोटरी गार्डन असून त्यामध्ये लहान मुलांचे खेळणे, स्लाइड्स, झुले, प्राणांच्या प्रतिकृती आहेत, त्यामुळे चिमुकले येथे येऊन येथेच्छ आनंद लुटतात. तसेच येथे जिवंत ससे, मासे, कासव, शंख यांचे विशेष संगोपन केले जाते. मंदिर संस्थेचे एक भक्त निवास असून सर्व प्रकारच्या सोईसुविधा येथे उपलब्ध आहेत.
हे मंदिर दिवसेंदिवस पिकनिक स्पॉट आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे अनेक शाळा, महाविद्यालये, संघटना, राजकीय पक्ष, संघटना, क्लब, समाज, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्था येथे विविध कार्यक्रमांसाठी व सहलीसाठी येत असतात. त्यांना व्यवस्थापनाकडून विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले जाते. तथापि, कोणत्याही कार्यक्रमापूर्वी परवानगी घेणे आवश्यक आहे. मंदिर व्यवस्थापनास कार्यक्रमास परवानगी देण्याचे किंवा नकरण्याचे पूर्ण अधिकार आहेत. येथे पर्यटकांसाठी दोन एसी रूम, एक संलग्न नॉन-एसी रूम, मंदिराच्या आवारात दोन मोठे हॉल आणि पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे असून परवडणाऱ्या दरात राहण्याची सोय उपलब्ध केली जाते. याव्यतिरिक्त शहरात इतर हॉटेल व लॉज देखील सहज उपलब्ध होतात.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांसाठी मंदिर परिसरात भव्य पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंग मध्ये लागलेल्या वाहनांवर मंदिर व्यवस्थापनाकडून मंगळग्रह मंदिर, अमळनेर या नावाचे वर दर्शविल्याप्रमाणे स्टिकर लावण्यात येते.
मंदिराची वेळ
सकाळी ०५:०० - नित्यप्रभात मंगल अभिषेक
सकाळी ०७:०० - महाआरती
सकाळी ०७:०० ते रात्री ०९:०० - दर्शनासाठी खुले
सकाळी ०७:०० ते संध्या. ०६:०० - अभिषेक पूजा
दुपारी १२:०० - नैवेद्य
संध्याकाळी ०६:०० - महाआरती
कसे पोहचाल ?
श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे देवस्थान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या तालुक्याच्या ठिकाणी आहे. अमळनेर हे जळगावपासून ६० किमी तसेच धुळे या जिल्ह्याच्या ठिकाणापासून अवघ्या ३५ किमी अंतरावर आहे. अमळनेर या शहरास ऐतिहासिकदृष्ट्या खूप मोठा वारसा लाभलेला आहे. अमळनेर येथे जाण्यासाठी बस तसेच रेल्वे ही प्रमुख दळणवळणाची साधने आहेत.



0 Comments