श्री क्षेत्र उनपदेव


* श्री क्षेत्र उनपदेव - गरम पाण्याचा झरा 


प्राचीन काळापासून पौराणिक महत्व प्राप्त झालेल्या श्रीक्षेत्र उनपदेव हे तीर्थक्षेत्र संपूर्ण खान्देशासह अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. सातपुड्याच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात घनदाट जंगलात वसलेले तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र उनपदेव हे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या अडावद या गावापासून अवघ्या ५ किमी अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. प्रभू श्रीरामचंद्र व शरभंग ऋषी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या क्षेत्राचा उल्लेख महर्षी वाल्मिकी यांनी रामायणात केलेला आहे. शरभंग ऋषींचे शरीर कुष्ठरोगाने पिडीत होते. १४ वर्षे वनवासात असतांना प्रभू श्रीराम चंद्राची त्यांच्याशी भेट झाली व त्यांना या रोगातून मुक्त करण्यासाठी उनपदेव येथे श्रीरामांनी अग्निबाण जमिनीत मारला व त्यातून उष्ण जलधारा निघाल्या. त्या उष्ण जलधारांच्या पाण्यात स्नान केल्यामुळे शरभंग ऋषी कुष्ठरोगातून मुक्त झाले. तेव्हा पासून आजपर्यंत येथे उष्ण जलधारा अव्याहतपणे गोमुखातून वाहतच आहेत. ज्यांना त्वचारोगाचा त्रास आहे त्यांनी या उष्ण जलधारात स्नान केल्यास रोगी पूर्णपणे बरा होतो अशी धारणा आजही भाविकांमध्ये असल्याने बरेच जण याठिकाणी स्नानासाठी येत असतात, हे येथील अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे.

उनपदेव हे ठिकाण जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. जवळच बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गावरील अडावद हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून अडावद येथून उनपदेव जाण्यासाठी रिक्षा अथवा बसेस उपलब्ध असतात. उनपदेव हे तीर्थक्षेत्र यावल वनविभागाच्या अंतर्गत असून अडावद पासून अवघ्या 5 किमी अंतरावर आहे.

उनपदेव येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. पौष महिना हिवाळ्यात येत असल्यामुळे येथील वातावरण अगदी प्रसन्न व सर्वत्र हिरवळीचे असते, त्यामुळे खूप मोठ्या संख्येने पर्यटक, भाविक तसेच त्वचारोगग्रस्त रुग्ण याठिकाणी दरवर्षी आवर्जून भेट देत असतात. यात्रोस्तव काळातही प्रामुख्याने दर रविवारी येथे पर्यटक यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी या निसर्गरम्य ठिकाणी येत असतात. यात्रोत्सव काळात अडावद येथून उनपदेव येथे रविवारी यात्रा स्पेशल जादा बसेस देखील ये-जा करीत असतात. पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण दिवसेंदिवस विकसित होत आहे.

श्री उनपदेव तिर्थक्षेत्र येथे गरम पाण्याची सतत सुरू असणारी जलधारा असून ती गोमुखातून वाहत असते. गोमुखाजवळच एक प्रशस्त स्नानकुंड आहे. स्नानकुंडाशेजारीच महिलांसाठी स्वतंत्र स्नानागाराची देखील व्यवस्था केलेली आहे. परिसरात शरभंग ऋषींची गुफा, महादेवाचे मंदिर तसेच हनुमान मंदिर देखील आहे. तीर्थक्षेत्र असल्याने बऱ्याचशा पूजाविधी या ठिकाणी संपन्न होतात. तसेच येथे लग्नकार्य व इतर कार्यांसाठी एक मंगल कार्यालय देखील उभारण्यात आलेले आहे. लग्नकार्य व इतर कार्यासाठी येथे ठराविक देणगी देऊन कार्ये पार पाडली जातात. 

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य वातारणात लहान मुलांना खेळण्यासाठी सुंदर अशी बाग असून बागेत स्लाइड्स, झुले व इतर खेळणी असल्याने चिमुकल्यांना हे ठिकाण अधिकच आकर्षित करते. ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रतिकृती असून परिसराला शोभिवंत करतात. परिसरात एक लहानसा मानवनिर्मित तलाव असून तलावाच्या भोवताली प्रदिक्षणा घालणारी मिनी रेल्वे हे येथील मुख्य आकर्षण आहे. सध्या मिनी रेल्वे काही कारणास्तव बंद आहे परंतु लवकरच ती पुन्हा रुळावर धावेल यात शंका नाही. लहान्यांसोबतच सर्वांसाठी हे निसर्गरम्य, शांत ठिकाण एक दिवसीय सहलीसाठी  विशेष प्रसिध्द आहे.

* कसे पोहचता येईल ?
श्री क्षेत्र उनपदेव  हे ठिकाण बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या राष्ट्रीय मार्गापासुन उत्तरेकडे सातपुड्याच्या पायथ्याशी असून येथे जाण्यसाठी चोपडा - यावल रस्त्यावरील अडावद गावापासून उत्तरेस 5 किमी जावे लागते. पौष महिन्यात जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेच्या वेळी चोपडा व अडावद येथून जादा बसेसचे नियोजन केलेले असते. यात्रोत्सव काळ वगळता इतर वेळी येथे जाण्यासाठी खाजगी वाहन अथवा अडावद येथून रिक्षाने जाता येते. सध्या उनपदेव परिसरात आदिवासी लोकवस्ती झालेली असून अडावद येथे शिक्षणासाठी येथील काही विद्यार्थी येत असतात. त्यांच्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून बसची व्यवस्था केलेली आहे.



Post a Comment

2 Comments