श्रीक्षेत्र मनुदेवी

* सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी *

अडावद येथून सुमारे २५ किमी अंतरावर ईशान्येस सातपुड्याच्या कुशीत अगदी उंचावर निसर्गरम्य अशा घनदाट जंगलात अवघ्या खान्देशची कुलदैवत असणाऱ्या श्री मनुदेवीचे मंदिर आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे उंचावरून कोसळणारा धबधबा. तसेच मंदिराच्या परिसरात चहुबाजूंनी सातपुडा पर्वताचे उंचच उंच कडे असून सर्वत्र घनदाट जंगल आहे. या जंगलात अधून मधून हरीण, माकड तसेच इतर वन्यप्राणी दृष्टीस पडतात. मंदिराच्या पायथ्यापर्यंत वाहने थेट जातात केवळ पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास काही वेळेस रस्ता बंद असतो. पायथ्यापासून मंदिरापर्यंत जातांना सुमारे --- पायऱ्या चढून वर जावे लागते. येथे कायम भाविकांची तसेच पर्यटकांची वर्दळ सुरु असल्याने पायऱ्यांवर पायथ्यापासून ते थेट मंदिरापर्यंत पत्रांची कमान (शेड) तयार केलेली आहे जेणेकरून उन्हाळ्यात व पावसाळ्यात भाविकांना त्रास होऊ नये. पायथ्याशी पूजेच्या साहित्याची तसेच चहा-नाश्त्याची दुकाने असून पायऱ्या चढत गेल्यावर देखील मंदिराच्या समोर दुकानांच्या रांगा आहेत. नवरात्रोत्सवात तसेच पावसाळ्यात या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त होऊन पर्यटक तसेच भाविकांची अफाट गर्दी याठिकाणी सहलीचा व दर्शनाचा आनंद घेण्यासाठी येत असते. 

* नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सवात याठिकाणी खान्देशासह अवघ्या महाराष्ट्रातून तसेच शेजारील मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातून भाविक श्री मानुमातेच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणत भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूकीचे नियोजन करणे हे जिकरीचे असते. नवरात्रोत्सवात दूरवरून अनेक ठिकाणाहून पायी दिंड्या येतात. या दिंडीमध्ये आबालवृद्ध सामील झालेले असतात. या पायी चालत येणाऱ्या दिंड्या मानुमातेचा जयघोष करीत वाजत गाजत 5/10 दिवस पायी चालत असतात. परंतु मानुदेवीप्रती असणारी श्रद्धा व विश्वास यामुळे कोणालाही हा पायी प्रवास त्रासयुक्त ठरत नाही. दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी दिंडी रात्री मुक्कामास थांबतात. त्याठिकाणी संबंधित गावातील ग्रामस्थ यांची जेवणाची व राहण्याची सोय करीत असतात.


पायी येणाऱ्या भाविकांची वर्दळ बघता व घाटात होणारी वाहतूककोंडी बघता नवरात्रोत्सवात मानापुरी या आदिवासी पाड्याजवळच खाजगी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली असते व येथून पुढे 5 किमी घाटात केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भाविकांची ने-आण करण्यासाठी एका पाठोपाठ एक सुरुच असतात. यासाठी श्री मनुदेवी प्रतिष्ठानचे विश्वस्त व परिसरातील स्वयंसेवक पार्किंग सह संपूर्ण नियोजन करतात व भाविकांची विशेष काळजी घेतात. तसेच श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी अनेक संस्था व दानशूर प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी फराळ म्हणून मोफत वाटतात.


* मंदिराचा इतिहास 
जुने स्वरूप


मनुदेवी क्षेत्राजवळ गेल्यावर सुरुवातीला उंच उंच वॄक्ष आढळून येतात. श्री मनुदेवीचे मंदिर अतिप्राचीन आहे हे त्याच्या जुन्या अवशेषावरुन तसेच तेथे झालेल्या उत्खनन कार्यातून व तेथे सापडलेल्या मूर्तीवरुन लक्षात येते. या तिर्थक्षेत्राचा शोध सुरुवातीला इ. स. 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज कै. पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते. या मनुदेवीच्या मंदिरापासून सातपुडा पर्वताकडे गेल्यास सुमारे 4 ते 5 कि. मी. अंतरावर गवळी वाड्यांचे अवशेष आजही आपणास पहावयास मिळतात. ईश्वसेन नावाचा राजा या भागात राज्य करीत असे व  त्याने या हेमाडपंथी मंदिराची बांधणी केलेली असल्याबाबतचे अनेक ठिकाणी उल्लेख आढळतात. बूरुजांचे काही भाग ढासळलेले असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरुन पूर्वीच्या बांधकामाची रचना अथवा मजबुती याविषयी अंदाज करता येऊ शकतो. मंदिराच्या परिसरात 7 ते 8 विहरी आढळतात. या भव्य मंदिराचा सभामंडप 86 फुट लांब  व  50 फूट रुंद असून  गाभारा 22 फुट लांबीचा व 14 फूट रुंदीचा आहे. यावरून याची भव्यता लक्षात येते.

(स्त्रोत:- सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान)

* निसर्गरम्य परिसर
धबधबा
मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 120 मीटर (400 फूट) उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे. वर्षातील जवळपास 7 ते 8 महिने कोसळणाऱ्या या धबधब्याचे पाणी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी येते. येथे शासनाच्या मदतीने मनुदेवी मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर एक पाझर तलाव बांधण्यात आलेला आहे. मंदिर परिसरात कोसळणाऱ्या धबधब्याचे पाणी पाझर तलावापर्यंत येईपर्यंत रस्त्यात हे पाणी 7 ठिकाणी लहान पुलांवरून वाहते. त्यामुळे जास्त पावसावेळी रस्ता प्रशासनाद्वारे तात्पुरता बंद केला जाऊन परिसर प्रतिबंधित केला जातो. पाझर तलावाशेजारीच छोटेशे सुंदर हनुमानाचे मंदिर असून समोरच एक छोटीशी बाग आहे. या बागेत लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळी खेळणी तसेच आकर्षक झाडेझुडुपे लावलेली आहेत. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य मार्गावरून जाताना चिंचोली-किनगाव दरम्यान आडगाव फाट्यापासून उत्तरेस सातपुड्याच्या कुशीत हे पावन व निसर्गरम्य क्षेत्र आहे. फाट्यापासून जाताना आडगावच्या पुढे आदिवासी वस्ती असणारे मानापुरी हे छोटेसे गाव लागते. तेथून थेट श्री मनुदेवी मंदिरापर्यंत सुमारे 5 किमी चा घनदाट जंगलांनी व्याप्त, रस्त्याच्या दुतर्फा मनमोहक वनराई असलेला घाट रस्ता आहे. या घाटातून जाताना पर्यटक ठिकठिकाणी थांबून फोटो काढतात व निसर्गाचा आनंद घेतात. त्यामुळे श्रीक्षेत्र मनुदेवीचा परिसर अतिशय रमणीय व मनमोहक असा आहे. अतिशय प्रेक्षणीय असे हे ठिकाण धार्मिक दृष्ट्या तसेच पर्यटनीय दृष्ट्या दिवसेंदिवस विकसीत होत आहे. तसेच येथे भाविंकाबरोबर पर्यटक, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, सहली मोठ्या संख्येने येत असतात. या तिर्थक्षेत्राचा पर्यटन स्थळ म्हणूनही विकास व्हावा अशी अपेक्षा भाविंकाकडून विश्वस्त मंडळाकडून शासनाकडे वारंवार व्यक्त केली जात आहे.

* देवीचे उत्सव 
दररोज मंदिरात भाविकांची गर्दी सुरूच असते. दर्शनासाठी दररोज सुमारे 1000 ते 1500 लोक येत असतात. तसेच चैत्र शुद्ध अष्टमी यात्रोत्सवाचा तसेच इतर महोत्सवाचा शुभ मुहूर्त साधत तब्बल 15000 ते 20000 भाविक श्रीमनुदेवीचे देवीचे दर्शन घेत असतात. प्रत्येक वर्षाच्या विशिष्ट दिवशी/तिथी ला देवीचे उत्सव वेगवेगळे साजरे केले जातात. नवचंडी महायज्ञाचे आयोजन देखील येथे केले जाते तसेच देवीचा यात्रोस्तव साजरा केला जातो. काही विशिष्ट दिवस भाविकांना दर्शनासाठी योग्य व शुभमुहूर्ताचे मानले जातात. प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ महिन्याच्या शुद्ध अष्टमीच्या दिवशी देवीवर नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले जाते. तसेच संपुर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी (बैलपोळा) देवीची यात्रा भरते. अश्वीन महिन्यात नवरात्रोस्तव तसेच देवीची यात्रा असते. विश्वस्त मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी मंदिरामध्ये पुर्णवेळ पुजारी/महाराज उपलब्ध केल्याने भाविक आता धार्मिक कार्यक्रम ( नवस, जावळ, मानता, अभिषेक , लग्न इ. ) केव्हाही साजरे करु शकतात.
(स्त्रोत:- सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी सेवा प्रतिष्ठान)


Download करा. Download करा.







* कसे पोहचता येईल ?
श्री क्षेत्र मनुदेवी हे ठिकाण बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या महामार्गावर असणाऱ्या चिंचोली व किनगाव या गावांच्या दरम्यान आंडगाव फाट्यापासून उत्तरेस सातपुड्याच्या कुशीत अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे. फाट्यापासून मनुदेवी जातांना 3 किमीवर आडगाव लागते तर आडगाव पासून पुढे 3 किमीवर श्री हनुमानाचे मंदिर आहे. येथपर्यंत पक्का डांबरी रस्ता आहे. श्री हनुमान मंदिरापासून ते  मनुदेवी तिर्थक्षेत्र हे जवळपास ३ किलोमीटर अंतर आहे. महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीमुळे हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतलेला आहे. त्यामुळे आता खाजगी वाहने ( दुचाकी, ऑटोरिक्षा, कार, जीप, टॅक्सी इ.) थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगांव ते श्री मनुदेवी मंदिर हे अंतर सुमारे 35 कि. मी. असून चोपड्यापासून 40 किमी तर यावल पासून 25 किमी आहे. जळगाव येथून मिनी बस सेवा थेट पायथ्यापर्यंत सुरु झालेली आहे. तरी त्यासाठी जळगाव बसस्थानकाशी संपर्क साधणे आवश्यक असते.

------------------------------------
* राज्य परिवहनच्या बसेस ची वेळ -
जळगाव येथूनस.०८:१५, ११:१५  दु.०३:३०वा. (जळगाव-विदगाव-डाम्भूर्णी-किनगाव-आडगाव-मनुदेवी)

चौकशी:- जळगाव बसस्थानक (०२५७-२२२९७७४ ), यावल बसस्थानक(-०२५८५-२६१२२७)
काही वेळेस रस्त्याच्या अडचणींमुळे अथवा इतर कारणास्तव बसेस बंद देखील असतात.
------------------------------------

याव्यतिरिक्त दिवसभर चोपडा-यावल/रावेर/बऱ्हाणपूर या मार्गावर जाणाऱ्या बसेस असतात. त्यातून किनगाव अथवा चिंचोली गावापर्यंत जाता येते. तेथून खाजगी वाहनांनी व रिक्षाने देखील पोहचता येते.



Post a Comment

0 Comments