श्री काळभैरव देवस्थान

* श्री काळभैरव देवस्थान (चांदसणी) *

अडावद येथून अवघ्या ५ किमी अंतरावर पूर्वेला चांदसणी (कमळगांव) येथे खान्देशवासियांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत अशा श्री काळभैरवाचे देवस्थान आहे. श्री काळभैरव म्हणजे नवसाला पावणारा देव अशी या देवस्थानाची ख्याती असल्याने दरवर्षी हजारो भाविक भक्त येथे नवस फेडण्यासाठी येत असतात. श्री काळभैरव मंदिर हे गावाच्या मध्यभागी असून परिसरात दाट लोकवस्ती आहे.  मंदिराचा परिसर खूप मोठा असून मंदिरात एक प्रशस्त अन्नछत्र देखील आहे. वर्षभर विविध धार्मिक/सामाजिक कार्यक्रम याठिकाणी पार पडत असतात. मंदिराची कलाकृती, मंदिराच्या सभोवती असणारी सुंदर अशी लहान मोठी झाडे झुडपे भाविकांना अधिक आकर्षित करतात. काळभैरव देवस्थानाची एक नोंदणीकृत संस्था असल्याने मंदिराच्या विकासात झपाट्याने वाढ होत आहे. येथील एक अनन्यसाधारण वैशिष्टय़ म्हणजे  सर्पदंश झालेल्या रुग्णास येथे दर्शनासाठी आणत असतात. विश्वस्त तसेच ग्रामस्थ अहोरात्र रुग्णांची सेवा करतात. 

चांदसणी येथील श्री काळभैरव देवस्थानाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळभैरव जयंती नंतर जवळपास आठवडाभराने देवदिवाळी म्हणजेच नाग दीपावली च्या दिवशी भरणारा यात्रोत्सव होय. चांदसणी येथे दरवर्षी या दिवशी जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. मार्गशीर्ष शु. ५ पासून २ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात जवळच्या मध्यप्रदेश, गुजरात राज्यातूनही हजारो भाविक हजेरी लावत असतात.  येथील मुख्य यात्रा केवळ एकाच दिवसाची असते परंतु या एकाच दिवशी सुमारे ४ ते ५ लाख भाविक येथे श्री काळभैरवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. एवढ्या मोठ्या भाविकांच्या संख्येवरून यात्रेच्या स्वरूपाचा अंदाज आपणास नक्कीच आला असेल. दिवसेंदिवस येथे भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. परिसरातील माहेरवाशी स्त्रियांसाठी जणू हा एक प्रकारे सणच असतो. परिसरातील जवळपास प्रत्येक माहेरवाशी महिला यात्रेसाठी आपापल्या माहेरी येतात व यात्रेचा आनंद लुटतात. यात्रेत मोठमोठी वेगवेगळ्या प्रकारची पाळणे, विविध प्रकारची खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने इ. दुकाने येथे यादिवशी असतात. तसेच रात्री याठिकाणी खानदेशचे प्रसिद्ध असणारे तमाशा लोकनृत्य देखील सादर करण्यासाठी कलाकार येतात. यात्रेत होणारी वर्दळ बघता येथे वाहतुकीचे नियोजन करणे खूप जिकरीचे व आव्हानात्मक असते. यासाठी यात्रा कालावधीत अवैध वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येऊन एस. टी. महामंडळाच्या बसेस चे नियोजन भाविकांना ने-आण करण्यासाठी केलेले असते. जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून तसेच बाहेरील जिल्ह्यातून देखील येथे एकूण सुमारे ६० ते ७० बसेसचे नियोजन केलेले असते. या यात्रा स्पेशल बसेस अडावद येथून यात्रेच्या ठिकाणापर्यंत म्हणजेच चांदसणी पर्यंत एका पाठोपाठ एक सुरूच असतात. यात्रेचे मोठे स्वरूप व वर्दळ बघता गावाच्या अलीकडेच मोठी पार्किंगची व्यवस्था केलेली असते. तसेच यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष पोलीस पथक बोलावून येथे चोख बंदोबस्त ठेवला जातो. परिसरातील चांदसणी- कमळगाव, रुखणखेडे, पिंप्री, मितावली, पुनगाव, देवगाव, पारगाव, वटार, सुटकार, खर्डी, अडावद, लोणी, पंचक, धानोरा या गावातील ग्रामस्थांसाठी ही यात्रा जणू दसरा दिवाळीचा सणच असते. तसेच यात्रेच्या जवळपास आठवडाभर आधी काळभैरव जयंती सोहळा आयोजित करण्यात येऊन त्यानिमित्ताने महाप्रसाद म्हणून मोठ्या भंडाऱ्याचे देखील आयोजन केले जाते. प्रचंड जनसागर येथे जातीय सलोख्याचे उदाहरण देत प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत असतो. असे हे काळभैरव मंदिर खान्देशचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे वैभव आहे. या प्रसिद्ध अशा ठिकाणी जाण्यासाठी बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या महामार्गावरील अडावद तसेच धानोरा येथून थेट जाता येते. तसेच येथे जाण्यासाठी अडावद येथून दररोज वेळोवेळी बसेस असतात.

चांदसणी येथील काळभैरव मंदिरात दररोज भाविकांची वर्दळ सुरूच असते. दररोज या ठिकाणी जिल्ह्यातून तसेच अवघ्या खान्देश मधून भाविक येत असतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे श्री काळभैरवाचे मंदिर हे अगदी गावाच्या मध्यभागी असून आजूबाजूला घरे आहेत. तसेच याठिकाणी रोज दोन्ही वेळ पूजापाठ केला जाऊन आरती केली जाते. काळभैरवासाठी गुळाचा व नारळाचा प्रसाद वाहिला जातो.

अडावद येथे देखील बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर गावाला लागुनच श्री काळभैरवाचे लहान मंदिर आहे. याठिकाणी देखील याच दिवशी लहान यात्रा भरते. हे ठिकाण रस्त्याला लागुनच असल्याने यास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. याठिकाणी देखील परिसरातील अनेक भागातून भाविक येतात व यात्रेचा तसेच दर्शनाचा लाभ घेतात. ही यात्रा खास चिमुकल्यांसाठी असते. येथे देखील वेगवेगळी फराळाची दुकाने, खेळणी इ ची दुकाने असतात. व लहान मुलांसाठी पाळणे व इतर खेळणी याठिकाणी असल्याने चिमुकले विशेष आकर्षित होतात.

येथून जवळच साईबाबा मंदिर असल्याने अनेक भाविकगण काळभैरव मंदिरासोबतच श्री साई बाबा यांचे देखील दर्शन घेतात. ही दोन्ही मंदिरे चोपड्याकडून यावल कडे जातांना अडावद गावाबाहेरच असून रस्त्याच्या दक्षिणेला आपल्या नजरेस पडतील. श्री साईबाबा मंदिरावर देखील दर गुरुवारी भाविकांची विशेष गर्दी असते.

॥ श्री कालभैरवं अष्टकम ॥
देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ १॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे ॥२॥

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे  ॥३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे  ॥४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥ ५॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥

भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम॥९॥

इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम ॥



* भावलिंग मल्लिनाथ महाराज आश्रम (रुखनखेडे) *

अडावद येथून अवघ्या ३ किमी अंतरावर चांदसणी - कमळगाव रस्त्यावर रुखनखेडे येथे भावलिंग मल्लिनाथ महाराज आश्रम तसेच जागृत असे महादेवाचे मंदिर उभारण्यात आलेले आहे. रूखनखेडे प्रगणे अडावद येथील मुळ रहिवासी असलेल्या शिष्याने त्यांचे गुरुवर्य ॐ श्री श्री श्री भावलिंग मल्लिनाथ महाराज यांना त्यांच्या संकल्पपुर्ती निमित्त रूखनखेडे येथे अडीच एकर जमिन दान स्वरुपात देऊन तेथे भावलिंग मल्लिनाथ महाराज यांचा आश्रम गेल्या आठ वर्षा पासुन नावारुपाला आलेला आहे. या ठिकाणी कालांतराने भव्य दिव्य असे महादेवांचे मंदिर बांधण्यात आले असुन हे मंदिर रूखनखेडे सोबतच पंचक्रोशितील भाविकांसाठी धार्मिक पर्वणीसह ग्रामदैवत ठरत आहे. येथील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुबक कलाकृती करून अतिशय मनमोहक स्वरूपाचा कलश असणारे हे मंदिर  येथे बांधण्यात आलेले आहे.

रुखनखेडे येथील आश्रमात वर्षातून तिन उत्सव साजरे करण्यात येतात. त्यात महाशिवरात्रीभावलिंग मल्लिनाथ महाराज यांचा प्रकट दिन तसेच ३ नोव्हेंबर हा महादेव मंदिराचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. येथे दरवर्षी मंदिराचा स्थापना दिवस अर्थात ३ नोव्हेंबर या दिवसाला मोठ्या यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. आदल्या रात्री रूखनखेडे, पारगाव, प्रिंप्री, चांदसणी-कमळगाव, मितावली, अडावद, लोणी, पंचक, धानोरा इ. परिसरातील भजनी मंडळातर्फे जागरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम अयोजीत केला जातो. तसेच वर्धापन दिनादिवशी आश्रमात श्रीं चा महाभिषेक कार्यक्रम, जाहिर किर्तनाचा कार्यक्रम व त्यानंतर भंडारा(महाप्रसाद) इ. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पंचक्रोशितील भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ आपली हजेरी लावून घेत असतात. परिसरातील काही भाविक गण पायी चालत येऊन येथे हजेरी लावतात व आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा आनंद लुटतात.

* कसे पोहचता येईल ?
काळभैरव मंदिर (चांदसणी) व भावलिंग मल्लिनाथ महाराज आश्रम (रुखनखेडे) हे ठिकाण बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या राज्य मार्गापासून आत अनुक्रमे 5 किमी व  3 किमीवर आहे. तेथे पोहचण्यासाठी चोपडा-यावल मार्गावरील अडावद या गावापासून जावे लागते. अडावद येथून ठराविक वेळेला राज्य परिवहनाच्या बसेस उपलब्ध असतात. अडावद-पिंप्री, अडावद-मितावली या बसफेऱ्या येथून पुढे जातात. अडावद वरून जातांना आधी 3 किमी अंतरावर रुखनखेडे हे गांव लागते त्यानंतर पुढे 2 किमी अंतरावर चांदसणी हे गांव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस येथे वेळोवेळी उपलब्ध असतात. तसेच याव्यतिरिक्त खाजगी वाहनाने अथवा रिक्षा सारखी वाहने अडावद येथून उपलब्ध होतात.
----------------------------------
* राज्य परिवहनच्या बसेस ची वेळ -
अडावद येथूनसकाळी ०८:३०, ०९:००, ११:०० दु. ०२:००, ०४:०० व संध्या. ०७:०० वा.
-----------------------------------


नकाशा मोठा करण्यासाठी नकाशावर क्लिक करा. नकाशा ढोबळमानाने बनविलेला आहे.



Post a Comment

0 Comments