Whatsapp ची दुनिया - 1



आजच्या या सोशल मिडिया च्या युगात अनेकांना तंत्रज्ञानासंबंधी जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यातच काही गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करीत असताना असंख्य अडचणींना आपणास सामोरे जावे लागते. मात्र आता आपण गिरीजा अकॅडमी (एक अथांग ज्ञानसागर....) या संकेतस्थळावर वेगवेगळ्या मजेदार अशा तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी शिकणार आहोत व त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करणार आहोत.

तसेच आपणास तंत्रज्ञानाविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास अभिप्राय / सूचना द्याव्यात. शक्य असल्यास नक्कीच संबंधित विषयावर मी पोस्ट प्रकाशित करेल. आज आपण सर्वांच्या जीवनात आवश्यक बनलेल्या WhatsApp च्या वापराबाबत काही गोष्टी शिकणार आहोत. व्हाट्सअप मध्ये अनेक विशेष आणि महत्वाच्या गोष्टी आहेत परंतु आपण व्हाट्सअप मध्ये केवळ चॅट, स्टेटस आणि कॉल्स एवढ्याच गोष्टींचा वापर दैनंदिन करीत असतो. चला तर जाणून घेऊया ही Whatsapp ची अनोखी दुनिया...


आज आपण Whatsapp सुरु केल्यावर असणाऱ्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन टिंबे (dot) ज्याला आपण सेटिंग म्हणतो त्यामध्ये असणाऱ्या सुविधांविषयी जाणून घेणार आहोत. त्यात आपणास New group, New Broadcast, WhatsApp Web, Starred Messages व Setting असे पर्याय दिसतील. त्यातील सर्वच गोष्टी कदाचित आपणास माहित नसणार. त्यासाठी आज आपण सर्व महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.

New Group
व्हाट्सअप ग्रुप तयार करणे हे जवळपास सर्व व्हाट्सअप वापरकर्त्यांना अवगत आहे. तसेच याचा वापर कसा करावा हेदेखील सर्वांना माहितच आहे. तरी आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यासाठी व्हाट्सअप सुरू केल्यावर सर्वात वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन टिंब (सेटिंग मेन्यू) एकाखाली एक आपणास दिसतील त्यावर क्लिक करून दिसणाऱ्या पहिल्याच पर्यायावर म्हणजेच New Group (न्यू ग्रुप) या पर्यायावर क्लिक करून  आपण पण ग्रुप तयार करू शकतो. न्यू ग्रुप या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ग्रुपमध्ये ज्या सदस्यांना समाविष्ट करावयाची आहेत त्यांची नावे निवडावीत. पुढे गेल्यावर ग्रुपचे नाव व ग्रुपचा आयकॉन म्हणजेच ग्रुप ला दिसणारे छायाचित्राची निवड करावी. काही मिनिटातच आपला व्हाट्सअप ग्रुप तयार झालेला असेल.

New Broadcast 
न्यू ब्रॉडकास्ट हे व्हाट्सअप मधील एक अत्यंत महत्त्वाचे फीचर असून याबाबत आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल. आपण फक्त ग्रुप तयार करतो आणि ग्रुपच्या माध्यमातूनच ग्रुपमधील सदस्यांना संदेश पाठवितो. परंतु ब्रॉडकास्ट हा देखील ग्रुप सारखाच एक पर्याय असून यामध्ये आपण ज्या सदस्यांना ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये समाविष्ट करतो त्या सर्वांना आपण एकाच वेळी संदेश पाठवू शकतो. 

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ग्रुप आणि ब्रॉडकास्ट यामध्ये नेमका फरक काय? तर यामधील फरक असा की ग्रुपमध्ये असलेल्या सर्व सदस्यांना ग्रुपमध्ये इतर कोणती सदस्य आहेत, त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक दिसतात. परंतु न्यू ब्रॉडकास्ट या पर्यायात एखादा संदेश आपल्याला वारंवार काही ठराविक लोकांना पाठवायचा असल्यास त्यांची नावे ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये टाकून आपण एकाच वेळी त्या सर्वांना संदेश पाठवू शकतो. याचा फायदा असा की आपल्याला वारंवार ज्या लोकांना संदेश पाठवायचे आहेत त्यांची नावे शोधत बसण्याची आवश्यकता नाही एकदाची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केली की आपल्याला हवा तो संदेश या सर्वांपर्यंत आपण वैयक्तिक संदेश ज्यापद्धतीने पाठवतो त्याच पद्धतीने पाठवू शकतो. यामुळे त्या समोरच्या व्यक्तींना कळणार देखील नाही की आपण एकाच वेळी किती लोकांना हा संदेश पाठविलेला आहे. त्यांना आपण वैयक्तिक संदेश पाठविल्याचे समजेल.

या पर्यायाचा फायदा जाहिरात, घोषणा, किंवा मिटिंग साठी होऊ शकतो. Broadcast सदस्यांची यादी बनवण्याची पद्धत ही ग्रुप तयार करण्याच्या पद्धतीसारखीच आहे. या यादीला ग्रुप ला नाव देतो त्याप्रमाणे नाव देखील देता येते. याचा आयकॉन हा लाउडस्पीकर चा सिम्बॉल असणारा असतो.

Whatsapp Web 
(संगणक/लॅपटाॅपवर WhatsApp चा वापर)
सध्या WhatsApp हे प्रत्येकाच्या जीवनातील मनोरंजनाचे साधन झालेले आहे. परंतु असे असताना देखील काही या WhatsApp पासून महत्वाची माहिती देखील घेतात व आपल्या दैनंदिन जीवनात याकडे केवळ मनोरंजनाचे साधन न बघता अभ्यासाचे तसेच ज्ञानाचे एक साधन म्हणून पाहतात. अशात याबाबत माहित असणे आपणास अत्यंत आवश्यक आहे. यात नेमक्या कोणत्या सुविधा वापरकर्त्यांना दिलेल्या आहेत?, कोणत्या गोष्टीचा कसा वापर करावा. आपल्या पैकी बऱ्याच वापरकर्त्यांना WhatsApp संगणकावर कसे वापरावे याबाबत माहित नसेल किंवा त्याचा वापर करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असेल. परंतु काळजी करू नका या लेखाच्या माध्यमातून आपणास अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलमधील WhatsApp संगणकावर वापरता येणार आहे. चला तर टप्प्यानुसार याची माहिती घेऊया. सुरुवात करण्याआधी जर आपण संगणक आणि मोबाईल घेऊन समोर बसलात आणि एक एक पायरी समजून घेऊन तशी क्रिया केल्यास आपल्यासाठी सोयीचे ठरेल.
  1. सर्वात आधी ज्या संगणकावर अथवा लॅपटाॅपवर आपण WhatsApp वापरू इच्छिता त्यावर इंटरनेटची जोडणी केलेली असावी. संगणक/लॅपटाॅपवर इंटरनेट ची जोडणी करण्यासाठी आपण मोबाईल केबल ने USB Tethering अथवा वाय-फाय चा उपयोग करू शकता.
  2.  आपल्या मोबाईल चे इंटरनेट(Mobile Data) सुरु करून WhatsApp मध्ये जावे.
  3. WhatsApp मध्ये गेल्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात आपणास तीन टिंबे एका खाली एक दिसतील, त्यांना स्पर्श करावा.
  4. त्यानंतर WhatsApp Web हा पर्याय निवडावा. पर्याय निवडताच आपल्या मोबाईल चा कॅमेरा QR कोड स्कॅन करण्यासाठी सज्ज असेल.
  5. आता संगणक/लॅपटाॅपवर ब्राऊझर( गुगल क्रोम/इंटरनेट एक्सप्लोरर) मध्ये जाऊन पुढील लिंक उघडावी.   ---      https://web.whatsapp.com/
  6. समोर तुम्हाला एक काळ्या रंगाचा WhatsApp चे चिन्ह मध्यभागी असणारा चौकोनाकृती QR कोड दिसेल, त्या समोर आपला मोबाईल धरावा व कोड स्कॅन करावा.
  7. काही सेकंदातच आपल्यासमोर संगणकावर आपले WhatsApp सुरु झालेले असेल.

Starred Messages
स्टार मेसेज म्हणजे नेमके काय असतात आणि ते कसे कार्य करतात हे आपण जाणून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या मेसेजला स्टार मेसेज म्हणून जतन करून ठेवतो त्यावेळी तो संदेश स्टार च्या चिन्हासह  आपल्या  चॅटमध्ये राहतो. यामुळे जो संदेश आपण स्टार करून ठेवतो तो चॅट क्लिअर करतेवेळी देखील पण जतन करून ठेऊ शकतो. चॅट क्लियर करीत असताना आपणास एक पर्याय त्या ठिकाणी दिसतो की Delete Starred Messages याचा अर्थ तुम्हाला स्टार केलेले मेसेज देखील डिलीट करायचे आहेत का ? त्या पर्याय समोर एक चौकोनी बॉक्स दिसतो त्याला टिचकी मारल्यावर त्या ठिकाणी बरोबरचे चिन्ह येते. जर तुम्हाला स्टार केलेले संदेश सुद्धा क्लियर किंवा डिलीट करायचे असतील तर तुम्ही तो पर्याय निवडावा अन्यथा त्यासमोर चौकोनी बॉक्स तसाच रिकामा राहू द्यावा म्हणजे आपण स्टार केलेले संदेश डिलीट होणार नाहीत. चॅटिंग हिस्टरी क्लिअर झाल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की जे संदेश आपण स्टार करून ठेवलेले होते ते आपल्या चॅटिंग विंडोमध्ये जतन आहेत म्हणजेच ते डिलीट झालेले नाहीत. त्यामुळे आपल्याला जे संदेश महत्त्वाचे वाटतात ते वेळोवेळी आपण स्टार करून ठेवले तर घाईगडबडीत आपण चॅट हिस्ट्री क्लियर करतेवेळी देखील तसेच राहतात. 

संदेश स्टार कसा करावा ? 
संदेशला स्टार करून ठेवणे अगदी सोपे आहे. त्यासाठी जो संदेश आपल्याला स्टार करून ठेवायचा आहे, त्यावर 2/3 सेकंद बोट ठेवून त्याला सिलेक्ट करावा. संदेश सिलेक्ट होताच सर्वात वरच्या बाजूला आपल्यासमोर काही सिम्बॉल समोर दिसतील. त्यामध्ये एक सिम्बॉल स्टारचा म्हणजेच चांदणी सारखा ★ असा दिसेल. त्या सिम्बॉलला क्लिक करावे. एवढे केल्यावर तो संदेश स्टार मेसेज म्हणून जतन केला होईल. संदेश स्टार झालेला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण त्या संदेशाच्या खाली सर्वात शेवटी जेथे आपणास संदेश पाठविल्याची वेळ दिसते तेथे वेळेच्या आधी ★ दिसेल.

स्टार केलेला संदेश आपणास जतन करावयाचा नाही आहे किंवा चुकून स्टार झाला आहे. अशा वेळी वरील प्रमाणेच प्रक्रिया करून आपण त्याला Unstarred करू शकता.

Settings
Whatsapp ची सेटिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग आहेत त्या आपण पुढील भागात पाहू.

काही अडचण असल्यास खाली Post a comment या विभागात जाऊन आम्हाला संपर्क साधु शकतात. तसेच आमच्या गिरीजा अकॅडमीशी जुडण्यासाठी ईमेल द्वारे सबस्क्राईब करा व नवनवीन उपयुक्त माहिती आपल्या ईमेल वर वेळोवेळी मिळवा. तसेच हा लेख पुढे पाठविण्यासाठी खालील whatsapp, facebook, twitter इ. आयकॉन दिलेले आहेत त्यावर क्लिक करा.


------------------------------------
वाचा - व्हाट्सअँप ची दुनिया - भाग 2
------------------------------------

Post a Comment

1 Comments