कोरोनाला घाबरू नका, जाणून घ्या- 2


कोरोनाला घाबरू नका, जाणून घ्या या मथळ्याखालील पहिल्या भागात आपणा कोरोना नेमका काय आहे? कोठून आला, त्याची लक्षणे काय असतात, त्यावर लस उपलब्ध आहे का तसेच त्यावर बचावात्मक कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सर्व माहिती जाणून घेतली. आता दुसऱ्या भागात आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, कोरोना होऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये, तसेच केंद्र शासनाने व विविध राज्य शासनांनी कोणकोणते कार्यक्रम सुरु केलेले आहेत, याशिवाय ठराविक डॉक्टर्स तसेच तज्ञांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत.

* प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी
सध्या कोरोना वर कोणतीही लस किंवा औषधी उपलब्ध नाही.परंतु रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण खालील उपचार करू शकतो.
  • भारत शासनाच्या आयुष मंत्रालयाने होमिओपॅथिक औषध अर्सेनिक अल्बम 30 यास रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपायकारक औषध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हे औषध आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने सांगितल्याप्रमाणे घेऊ शकतो.
  • तसेच श्वासोच्छवास घेण्यसाठी त्रास होऊ नये म्हणून दररोज गरम पाण्याची वाफ घेतल्यास उत्तम उपाय आहे. याव्यतिरिक्त फ्रीज मधील पाणी पिऊ नये तसेच कोमट पाणी वारंवार पिल्यास याचा फायदा होऊ शकतो.
  • काही वैद्य तसेच तज्ञांच्या मते काढा पिल्याने फायदा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक काढे आपण तज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  • इतर कोणत्याही औषधी ज्या रोगप्रतिकार शक्ती वाढवतील त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्यात. स्वत: घरच्या घरी कोणतेही प्रयोग करू नयेत. तज्ञांचा सल्ला घेऊनच औषधी व इतर गोष्टी कराव्यात.
  • दररोज व्यायाम तसेच योगसाधना करावी. सकारात्मक विचार ठेवावेत. नकारात्मक विचाराच्या लोकांपासून व गोष्टींपासून दूर रहावे.

* कोणत्या गोष्टी कराव्यात ?
  • दररोज व्यायाम तसेच योगसाधना करावी. सकारात्मक रहावे.
  • आपल्याला आवड असणाऱ्या गोष्टीसाठी वेळ द्यावा. 
  • आपल्या कुटुंबासाठी वेळ द्या, सर्वांना आनंदी कसे ठेवता येईल अशा गोष्टींवर भर द्यावा.
  • आधी सांगितल्याप्रमाणे हात स्वच्छ धुवावीत, मास्क, हँड सॅनिटायझर वापरावीत.
  • आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबापासून लांब राहणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस प्रशासन व इतर कोरोनायोध्यांचा आदर करावा. त्यांना सहकार्य करावे व दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
  • वेळोवेळी शासन/प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

* कोणत्या गोष्टी करू नयेत ?
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाची भीती मनात मुळीच बाळगू नये. हा एक साधारण आजार आहे, यापेक्षा किती तरी भयानक आजार भरपूर व्यक्तींना असतात.
  • नकारात्मक विचारांच्या लोकांच्या संपर्कात राहू नये.
  • वारंवार कोरोनासंबंधी बातम्या, आकडेवारी पाहू नये.
  • सोशल मिडिया वर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच सोशल मिडीयावर येणारे कोरोनासंबंधीचे संदेश पुढे पाठवू नये. Whatsapp, Facebook तसेच इतर सोशल मिडीयावर फिरणारे भरपूर संदेश केवळ अफवा किंवा जुने असतात. त्यामुळे असे संदेश पुढे पाठविणे टाळावे, कारण यामुळे आपल्याकडून कळत नकळत न्यायालयीन कायद्यांचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे आपणावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.
  • रुमाल/मास्क बांधल्याशिवाय बाहेर पडू नये.
  • आवश्यक नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
  • वृद्ध, गरोदर महिला, लहान बालक यांना शक्यतो बाहेर जाऊ देऊ नये.
  • अनावश्यक खर्च करू नये. सध्या ऑनलाईन खरेदीकडे लोकांचा जास्त कल आहे परंतु परिस्थितीचे भान ठेवून अनावश्यक खर्च टाळा.

* काही महत्वाचे मुद्दे :-
  • विषाणूचा प्रकार - सार्स कोव्ह 2 (SARS COV2)
  • चीनमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पहिला रुग्ण आढळला.
  • पहिला मृत्यू - 09 जानेवारी 2020
  • WHO कडून जागतिक महामारी म्हणून घोषणा - 11 मार्च 2020
  • WHO कडून आरोग्य आणीबाणी - 30 जानेवारी 2020
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी घोषित करणारे भारतातील पहिले राज्य - केरळ
  • भारतात पहिला कोरोनाबाधित रुग्ण - 29 जानेवारी 2020
  • भारतात पहिला मृत्यू - कलबुर्गी (कर्नाटक) - 12 मार्च 2020
  • महाराष्ट्रात पहिला रुग्ण - 09 मार्च 2020 (पुणे)- दुबई हुन आलेले
  • महाराष्ट्रात पहिला मृत्यू - 16 मार्च 2020 (कस्तुरबा रुग्णालय, मुंबई)
  • देशातील पहिला लॉकडाऊन - 25 मार्च 2020 (आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये)

* शासनाचे महत्वपूर्ण कार्यक्रम :-
  • भरोसा - ओडिशा विद्यापीठाने विद्यार्थी मदतीसाठी सुरू केलेला संकेत क्रमांक
  • मदत - जागतिक बँक - 1 अब्ज डॉलर
  • प्रवासी राहत मित्र - उत्तरप्रदेश शासन
  • आयुष कवच कोविड अँप - उत्तरप्रदेश शासनाचे
  • कोविड कवच एलिस - राष्ट्रीय विषाणू विज्ञान (NIV), पुणे
  • समुद्र सेतू - परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी (INS जलश्व व INS मगर या दोन जहाजांचा वापर)
  • श्रमिक ट्रेन - अडकलेल्या मजुरांना स्वतः च्या राज्यात जाण्यासाठी
  • गरुड संकेतस्थळ - Govt authorization for relief using drones - भारताचे नागरी उड्डाण मंत्रालयाने तयार केले
  • इकोसेन्स - प्राण्यांमध्ये कोरोनाची लक्षणे तापसण्यासाठी (लाळेतून) राष्ट्रीय पशु जैव तंत्रज्ञान संस्थेने तयार केलेले बायोसेन्सर (जैवसंवेदक)
  • कोविड कथा - मल्टीमीडिया मार्गदर्शक (प्रकाशन- आरोग्यमंत्री हर्षवर्धन)
  • या काळात एकाच वेळी 77 दशलक्ष लोकांनी रामानंद सागर प्रस्तुत रामायण पाहण्याचा विश्वविक्रम (16 एप्रिल 2020)
  • आयुरक्षा - दिल्ली पोलीस व AIMS यांचा आयुर्वेदाचा वापर वाढविण्यासंबंधी उपक्रम (कोरोना से जंग, दिल्ली पुलीस के संग)
  • YASH - Year of awareness on Science and Health (विज्ञान व तंत्रज्ञान विभाग)
  • अतुल्य - DRDO ने विकसित केलेले मायक्रोवेव्ह निर्जंतुकीकरण यंत्र
  • आयुर रक्षा क्लिनिक - केरळ शासन (जिल्हा व तालुका पातळीवर)
  • PM ई विद्या चॅनल - पहिली ते बारावी साठी स्वतंत्र टीव्ही चॅनल (17 मे 2020 रोजी घोषणा)
  • सहदार - कमी किमतीत व्हेन्टीलेटर (10,000 रु.)- इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी (पुलवामा, जम्मु काश्मीर), IIT मुंबई, NIT श्रीनगर
  • सुकून - द कोविड 19 बीट (द स्ट्रेस) - जम्मु काश्मीर केंद्रशासित प्रदेश
(माहिती संकलन - जगदिश सोळंके, गिरीजा अकॅडमी)


* ठराविक डॉक्टरांच्या/तज्ञांच्या प्रतिक्रिया
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर न जाता आरोग्याची काळजी कशी घ्यावी असा अनेकांना प्रश्न आहे. मुळात काय आहे हा कोरोना हेच आपल्याला माहीत नाही, या सर्वांमुळे एक अनामिक भीती सर्वांच्या मनामध्ये घर करत आहे. हीच भीती ही अकारण वेगवेगळ्या समस्यांना आमंत्रण देणारी ठरत आहे. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो आपण सावध असणं आणि आपल्यासोबतच कुटुंबियांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. 

मग या परिस्थितीत आपण नक्की काय करावे? 
सोप्पं आहे - या परिस्थितीत सगळ्यात आधी तर तणावमुक्त रहा, सद्य परिस्थितीला मानसिक स्वास्थ जपणे आवश्यक आहे. अनेक समस्यांसाठी योगाभ्यास एक रामबाण उपाय ठरु शकतो. योगाभ्यासमुळे आपली प्रतिकारशक्ती तर वाढतेच परंतु आपली श्वसनसंस्था देखील निरोगी राहते आणि स्वाभाविकपणे निरोगी शरीरास कोणतेही संक्रमण होणे कठीण असते. विविध योगासने ही निरोगी आयुष्यासाठी एक मूलमंत्र ठरू शकतात. अनुलोम-विलोम, दीर्घश्वसन, कपालभाती, भ्रामरी आणि उज्जयी प्राणायाम यासारखी योगासने तुम्हाला निरोगी आयुष्य देऊ शकतात. 
(टीप : कोणतेही आसन हे योग्य मार्गदर्शनाखाली करावे.)

- सौ. तनुजा कांबळे (निसर्गोपचारतज्ञ)
ओजस योगोपचार आणि ऊर्जाउपचार केंद्र, पुणे
सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप येणे ही सामान्य बाब आहे. परंतु सध्या यामुळे लोक अधिक चिंताग्रस्त झालेले दिसून येत आहेत. कारण कोरोना रुग्णांमध्येही सर्दी, खोकला, ताप, शिंका येणे इत्यादी लक्षणे आढळत आहेत. यामुळे नागरिकांच्या काळजीमध्ये भर पडलेली आहे. परंतू जर तुम्ही योग्य प्रकारे स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं तर कोरोना विषाणू तुमच्या आसपासही फिरकणार नाही. घराबाहेर पडताना आणि बाहेरुन घरी आल्यावर काही गोष्टींची योग्य ती काळजी घेतली तर कोरोनाला तुम्ही आपल्यापासून दूर ठेवू शकता. घाबरू नका. फक्त काळजी घ्या.
- डॉ. दिलीप नरहर अडावदकर 
( गोविंदा क्लिनिक, अडावद ) 

* उद्देश 
कोरोनाविषयी लेख लिहिण्याचा उद्देश केवळ आपणास योग्य माहिती असावी हा आहे. कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नये हा यामागील उद्देश आहे. तरी हा लेख जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवा. जेणेकरून सर्वाना कोरोनाबाबत योग्य माहिती होईल व कोरोनाची भीती मनातून निघेल. रिकामे संदेश पुढे पाठविण्यापेक्षा हा संदेश पुढे पाठवा, आपण पाठविलेला हा संदेश कोणाच्या मनातील भीती दूर करू शकतो तर कोणाला सकारात्मक होण्यास मदत करू शकतो.

लेख आवडल्यास प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. तसेच ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा व भरपूर उपयुक्त माहिती आपल्या ईमेल वर मिळवा. 
- जगदिश संतोष सोळंके
(अडावद ता. चोपडा जि. जळगाव)

* स्त्रोत - 
- WHO ने वेळोवेळी प्रसिध्द केलेले अहवाल
- वृत्तपत्रांतील लेख
- तज्ञांची/डॉक्टरांची मते

* अधिक माहितीसाठी क्लिक करा
भाग 2 - कोरोनाला घाबरू नका, जाणून घ्या




Post a Comment

0 Comments