खान्देशवासियांचा कानबाई उत्सव


कानबाई उत्सव आणि रोट
खान्देशची रूढी परंपरा बाधित ठेवणारा व खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी व सोमवारी साजरा केला जातो. बाहेरगावी असलेले भाऊबंधातील लोक या उत्सवाला आपल्या मुळगावी एकत्र येउन हा उत्सव मोठ्या उत्साहाने व एकात्मिक भावनेने साजरा करीत असतात. त्यामुळे याला भाऊबंदकीचा सण असे देखील म्हटले जाते. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी जर कोणाच्या घरी मुलगा जन्माला आला किंवा गाईला वासरू (गोऱ्हा) झाला तर त्या घरात कानबाईची स्थापना करण्यास सुरुवात केली जाते आणि दुसरे कारण म्हणजे कानबाईला मानलेला नवस पूर्ण झाला तरीदेखील कानबाईची स्थापना करतात, अशी भावना खान्देशवासीयांच्या मनात रुजलेली आहे. इतर देविदेवतांप्रमाणे कानबाईची कोठेही यात्रा भरत नाही. खान्देशात कानबाई उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. कानबाई ही श्रीफळ म्हणून मानल्या जाणाऱ्या नारळाच्या स्वरुपात घरोघरी स्थापन केली जाते. या उत्सवाच्या काळात कानबाईचे रोट देखील केले जातात. रोट म्हणजे सव्वा मुठ अथवा पाच मुठ कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या नावाचे घेऊन दळून आणलेले धान्याचे पीठ हे मुख्यत: गव्हाचे पीठ असते.



रोट करण्याची पद्धत
रोट करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. या मध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यसंख्या मोजून प्रत्येक सदस्याच्या नावाच्या सव्वा मुठ किंवा पाच मुठ याप्रमाणे गव्हाचे धान्य दळले जाते. व त्या धान्यापासून तयार करण्यात आलेल्या पिठापासून कणिकेच्या भाकरी, पोळ्या करतात. या कणीकेस रोट म्हणतात. या उत्सवात कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणालाही ते खाऊ दिले जात नाही कारण यामागील धारणा अशी आहे कि ते गहू दळत असताना कुटुंबातील ज्या सदस्यांचे नावे घेऊन सव्वा मुठ किंवा पाच मुठ धान्य घेतले असते त्यांनीच ते खायचे असतात. कुटुंबातील व्यक्तींनी हे रोट येणाऱ्या पौर्णिमेच्या आत संपवायचे असतात. जर काही कारणास्तव ते पौर्णिमेच्या आधी संपले नाहीत तर विधिवत पूजा करून गाईला ते खाऊ घातले जातात किंवा खड्डा करून त्यात दाबले जातात. अशी ही रोट करण्याची प्रथा परंपरेनुसार सुरु आहे. काही ठिकाणी घरापरत्वे किंवा भागानुसार या पद्धतीत थोडेफार बदल बघायला मिळतात. कानबाईचा उत्सव रविवार व सोमवारी असतो आणि रोटांची सुरुवात शनिवार पासून भाजी भाकरीच्या रोटापासून होते. शेतात उगवणारी किल्लूची भाजी व कळण्याची भाकरी हे याचे प्रमुख वैशिष्ट्य असते.

कानबाईची स्थापना
रविवारच्या दिवशी सकाळी संपूर्ण घर स्वच्छ केले जाऊन रंगरंगोटी व सजावट केली जाते. तसेच त्याआधी काही दिवसांपूर्वी घरातील सर्व भांडी, अंथरून, चादरी, गोधळ्या व इतर गोष्टी स्वच्छ धुवून काढले जातात. कानबाईची स्थापना करताना केळीच्या खांबाने तसेच कन्हेरीच्या खांबाने चौरंगाला सुशोभित करुन त्यावर तांब्याच्या कलश ठेवला जातो व त्यात सुपारी, पैसा (नाणे) टाकून पुजेची मांडणी केली जाते. कलश तसेच चौरंग सजवून त्यावर पारंपारिक नारळ जे कानबाई मातेच्या नावाने परनून आणलेले असते ते ठेवून त्याला नथ, डोळे, मुकुट घालून देवीचा शृंगार करतात. तसेच कलशाला गळ्यातला हार, मणी-मंगळसुत्र चढवले जाते. तसेच शेवंतीच्या फुलांची वेणी लावुन वरून ओढणी टाकली जाते. विविध देवीला परिधान करणारी सर्व अलंकारांनी त्या नारळाला सजविले जाते व देवीचे रूप त्यास प्राप्त होते. तसेच देवीला प्रिय असलेली फुले अर्पण करून, दिवा, अगरबत्ती लाऊन दुपारच्या वेळी विधीवत स्थापना केली जाते. देवीचा साज म्हणजेच भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा याच्या प्रतिकृती कणिकेपासून बनविले जाते.

संध्याकाळच्या वेळी महानैवेद्य तयार केला जातो. यामध्ये रोट (पोळी), गंगाफळाची भाजी म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी, खीर, पुरणाची पोळी किंवा पुरी, भजे, पापड इ. स्वरूपाचा नैवेद्य कानबाईला अर्पण केला जातो. याव्यतिरिक्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून साखर फुटाणे, लाह्या व काकडीचा प्रसाद केला जातो, कानबाईच्या या प्रसादाला विशेष महत्व आहे. यानंतर सर्व भाऊबंध व शेजारीपाजारी मिळून महाआरती केली जाते. रात्री सर्व भाऊबंध एकत्र येऊन महाप्रसाद ग्रहण करतात. सर्व भाऊबंध या काळात आपापले मतभेद विसरून एकत्र येतात त्यामुळे या सणाला भाऊबंधचा महिमा असे देखील म्हटले जाते.

रात्री वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ढोल ताश्यांच्या गजरात किंवा स्पीकर लाऊन कानबाईची आहिरणी भाषेतील गाणी वाजवत झिम्मा, फुगड्या, जागरण, गीतभजन असे विविध कार्यक्रम केले जातात. या मध्ये घरातील तसेच परिसरातील सर्व व्यक्ती भाग घेतात व आपला आनंद साजरा करतात. यात महिलांचा विशेष सहभाग असून घराबाहेर मोजक्या वेळीच निघणाऱ्या महिला देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन हा उत्सव साजरा करतात.

विसर्जन
दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी लवकर उठून कानबाईची विधिवत पूजा केली जाते व कानबाईच्या विसर्जनाची तयारी केली जाते. यावेळी दहीभाताचा नैवेद्य तयार केला जातो व सकाळी कानबाईची विधीवत पूजा करून विसर्जन करण्यात येते. विसर्जन करण्याची पद्धत देखील प्रत्येक भागानुसार थोड्याफार प्रमाणात वेगळी असते. अनेक ठिकाणी नदी किंवा पाण्याचे पवित्र ठिकाण असेल त्या ठिकाणापर्यंत ढोलताशे, वाजंत्री लाऊन गावातून मिरवणूका काढल्या जातात. या मिरवणुकीत गल्लीतील सर्व कानबाया एकत्र आणतात व घरातील तसेच गावातील सर्व अबालवृद्ध मोठ्या उत्साहाने या विसर्जन मिरवणुकीत भाग घेतात. वाजंत्री किंवा ढोलताश्यांच्या गजरात नाचत गाजत कानबाईची मिरवणूक गावभर मिरवितात. मिरवणुकीत चौरंगावरील कानबाई प्रत्येक व्यक्ती डोक्यावर घेऊन नाचतात. वाजत गाजत जात असताना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची डोक्यावर धरलेले चौरंग एकमेकांना जोडुन भेट घडवली जाते. विसर्जन मिरवणुकीतील वैशिष्ट्य असे की, डोक्यावर धरलेला चौरंग व त्यावर असणारी कानबाई हे नाचत असताना, फुगड्या खेळत असताना देखील आपल्या जागेवरून सरकत नाही, हे विशेषच म्हणावे लागेल. तसेच शेवटी नदीपर्यत पोहचल्यावर पुन्हा कानबाईची आरती करून विधिवत पूजा केली जाते व सर्व देवदेवतांची प्रतिकृती स्वच्छ धुवून विसर्जन क्रिया पूर्ण केली जाते. यामध्ये नारळाचे विसर्जन केले जात नाही. पुन्हा हे नारळ डोक्यावर घेऊन वाजंत्री मध्ये घराकडे परततात. उरलेला प्रसाद, नैवद्य हे सर्व घरातील मंडळीच संपवतात, बाहेरच्या व्यक्तीस प्रसाद वर्ज्य असतो.

असे हे कानबाई उत्सवाचे केवळ दोन दिवस असतात परंतु यामध्ये भाऊबंधच्या एकतेचे दर्शन घडते व अगदी मोठ्या उत्साहाने हा उत्सव खान्देशवासी साजरा करतात. कानबाई ही घरातील, गावातील इडा पिडा टाळते अशी धारणा लोकांमध्ये असते. डोळ्यांची पारणे फेडणारा हा उत्सव असल्याने जेव्हा हा उत्सव बघण्याची संधी मिळेल तेव्हा आपण स्वतः बघून उत्सवाचा आनंद घेतल्यास आपण भारावून गेल्याशिवाय राहणार नाहीत.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उमरखेड या गावी कानबाई मातेचे मंदिर नाध्ण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे देखील खान्देशवासी मोठ्या मोठ्या उत्साहाने दर्शन घेण्यासाठी जात असतात.



अहिराणी भाषा
अहिराणी ही महाराष्ट्रातील खान्देशवासीयांची बोलीभाषा आहे. अवघ्या खान्देशात अहिराणी भाषा बोलली जाते. अहिराणी ही केवळ बोलीभाषा असल्याने तिचे लिखाण करणे जरा अवघड जाते परंतु देवनागरी लिपी मध्ये मराठी प्रमाणेच अहिराणी भाषेचे लिखाण करतात येते. इतर भागातील लोकांना अहिराणी भाषा ऐकण्यास खूप विशेष वाटते. खान्देशातही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या लकब मध्ये अहिराणी भाषा बोलली जाते. जळगाव भागात सरळ शांतपणे तर धुळ्याकडे थोडी लकबदार व लांब सुरात भाषा बोलली जाते. खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव तिन्ही जिल्ह्यांमध्ये अहिराणी भाषा ही प्रमुख बोलीभाषा आहे. याची काही गमतीशीर उदाहरणे आपण पाहूया.

काही मराठी वाक्यांचे अहिराणी भाषेत केलेली रुपांतरे पुढीलप्रमाणे-

• काय करत आहेस? - काय करी राना?
• कुठे चालला? - कोडे चालना?
• घरातील सर्व कामे मलाच करावी लागतात - घरमाधला बठ्ठा/समदा कामे मालेच करना पडतस.
• श्रावण महिन्यात खूप पाऊस पडतो - श्रावण/सावन महिनामा गयरा पाऊस पडस.
• आमच्या गावाची लोकसंख्या 50 हजार आहे - आमना गावनी लोकसंख्या 50 हजार शे.
• हा कोरोना कुठून आला असेल? - हाऊ कोरोना कथाई उना हुईन? 

अशी भरपूर मजेदार वाक्य तुम्हाला अहिराणी भाषेत ऐकायला मिळतील. आपणस कोणताही वाक्याचे अहिराणी रुपांतर हवे असल्यास Comment मध्ये टाका व गमतीशीर अहिराणी शिका. 

आपण कुठेही जा, कोणत्याही वातावरणात रहा, कोणत्याही पदावर कार्य करा परंतु आपली संस्कृती, आपला वारसा यांचे जतन करा. तसेच आपल्या संस्कृतीचा व वारसाचा अभिमान बाळगा, लाजू नका, कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवायचे असेल तर तिचा प्रसार करायलाच हवा आणि तो आपणच नाही केला तर कोण करणार ? आपल्या मुलांना व पुढच्या पिढीलाही त्याबद्ल सांगा. आजचा लेख हा खान्देशची संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीनेच लोकांना याची माहिती व्हावी यासाठी लिहिलेला आहे. - जगदिश सोळंके, अडावद

कानबाईची काही प्रसिध्द गाणी
• कानबाई उनी वं शिरपूर गावले, माता उनी वं शिरपूर गावले,
• कसा करू शिंगार या कानबाई माय रानबाई ना
किल किल किलारी
• लाल लाल लुगडानी व माय तू हिरवा पदरनी 
कानबाई उनी कोण गावणी, खान्देशनी माय कुलस्वामिनी
कानबाई चालनी सासरले, मंग तिनी माय रडे
कानबाई चालनी गंगेवरी वं माय, साखर पेरत चालनी व माय
तुला काय लगाव होत ग कानबाई सांगी देतू माले
• कानबाई बसली चौरंगावरी
काया वावर मा, कानबाई लाडकी शे ना
कानड पाणी ले गई रे कान्हा
शिरपूरमा बासरी वाजनी रे, काय मनी माता नाचणी रे
मना घर शोभनले ये न व माय, इडा पिडा आम्ह्णी लई जाय माय
भेटीगाठी ले व मनी कानबाई माय तू
चौरंग सजाडा व मनी कानबाई ना गंगेवर जावाले
माय मनी कानबाई ठेवजो कृपा खान्देश वर
श्रावण महिना मा लागणी रिमझिम झडी, मनी कानबाई कानबाईनी फुगडी
उनी मनी कानबाई सैलाडी

वरील कानबाईची गाणी ही प्रामुख्याने खान्देशची बोलीभाषा असणारी अहिराणी भाषेतील आहेत. तसेच काही गाणी मराठी व अहिराणी या दोन्ही भाषांचे एकत्रीकरण करून तयार केलेले आहेत. ही गाणी आपणास अगदी सहजरीत्या इंटरनेट वर पाहायला मिळतात व यात कानबाई उत्सवाची देखील माहिती आपणास पहावयास मिळू शकते.

खाली फेसबुक, ट्वीटर,  व्हॉटसअप चे सिम्बॉल दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून ही पोस्ट जास्तीत जास्त पुढे पाठवा व आपल्या खानदेशी संस्कृतीबाबत लोकांना माहिती द्या.

पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि खाली Comment Box मध्ये किंवा अभिप्राय विभागात अभिप्राय नोंदवा. ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा आणि भरपूर महत्वपूर्ण माहिती मिळवा.
            - जगदिश सोळंके  (गिरीजा अकॅडमी, अडावद)


Post a Comment

7 Comments

  1. Everything was understood correctly by this information

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks.. We try for actual/correct information only.

      Delete
  2. भारी ओ सर..जय अहिराणी जय खान्देश...

    ReplyDelete
    Replies
    1. कानुमाते च्या आई वडीलांचे नाव सांगू शकता का सर?

      Delete