दिवाळी / दीपावली

दीपावली हा संस्कृत शब्द असून ह्याचा अर्थ 'दिव्यांच्या ओळी'. भारतीय कॅलेंडरनुसार दीपावली हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा अज्ञानावर (प्रकाशाचा अंधकारावर) विजय म्हणून प्रतित होतो.

दिवाळी हा प्रकाशाचा सण (Festival of Lights) आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, "आपो दीपो भवः" म्हणजेच तुम्ही स्वतःचं प्रकाश रूप व्हा. दिवाळीच्या दिवशी आपण दिव्यांचा लखलखाट करून, विद्युत रोषणाई करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून अंधकाराला दूर सारतो व प्रकाशमान होतो.

प्रत्येक सण उत्सव साजरा करण्यामागे कुठले तरी कारण किंवा उद्देश असतो. दिवाळी हा सण देखील यास अपवाद नाही. महर्षी वाल्मिकी रचित रामायणात असे सांगितले आहे की, लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम हे पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे या दिवशी अयोध्येत दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करण्यात आली. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण मानला गेला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

दिवाळी हा सण साधारणतः पाच दिवसांचा साजरा केला जातो, या पाचही दिवसांचे वेगवेगळे महत्व असून वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे केले जातात, ते आपण थोडक्यात समजूया.


💢 धनत्रयोदशी 💢
--------------------
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोकं ह्या दिवशी आपले सारे धन देवासमोर आणून ठेवत आणि त्याची पूजा करीत असत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकर मध्ये सुरक्षित ठेवले जाते. परंतु प्राचीन काळी लोकं आपले सारे धन देवासमोर  पसरवून ठेवत आणि समृद्धीचा आनंद घेत असत. केवळ सोनं, चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान, आपल्या व्यावसायिक वस्तू, आपल्याकडील पशुधन हे सुद्धा एक धनच आहे हे समजून उत्सव साजरा केला जात असे.

धनत्रयोदशीच्या दिवशी घर, दुकाने, कार्यालयीन परिसराची साफसफाई करुन फुलमाळा, रांगोळी तसेच रोषणाई करून ही ठिकाणे सजविली जातात. धन व ऐश्वर्याची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे मनोभावे स्वागत केले जाते. घरात दिव्यांची आरास केली जाते. घरातील पैसे, सोने, चांदी तसेच व्यावसायिकांच्या पैसे कमविण्याच्या वस्तूंचे पूजन केले जाते. तसेच पूजेची मांडणी करताना कलश, देवी लक्ष्मीचा फोटो, सप्तधान्य आदी वस्तूंची विशिष्ठ मांडणी करून पूजन केले जाते. भारतात बहुतांश ठिकाणी पशुधनाची देखील पूजा केली जाते.

या दिवसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस आयुर्वेदाची देवता अर्थात देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.

काही ठिकाणी ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनचं या सणाला यमदीपदान असे सुद्धा म्हटले जाते. आकस्मिक मृत्यूचे भय दूर करण्यासाठी या दिवशी मृत्यूदेवता यमाचे पूजन केले जाते.

💢 नरक चतुर्दशी 💢
--------------------
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी
नरक चतुर्दशी सण साजरा करण्यामागे देखील एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासुर प्रागज्योतीसपूर (नेपाळचा दक्षिण प्रांत) येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर, देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतःपुरात कैदेत ठेवले. त्यामुळे नरकासुराचा अंत एक स्त्री च्या हातून होईल असा शाप होता.
भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने राक्षस नरकासुराचा वध केला. कैदेत असणाऱ्या सर्व कन्यांची सुटका केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केलीत. त्या सर्व कन्यांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रातःस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्ती वर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. नरकासुराचा वध झाला त्या दिवशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी होती. नरकासूरच्या दहशतीतून व जुलूमशाहीतून स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात लोकांनी सर्वत्र दीपोत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा करण्यात येत आहे.

ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे यालाच अभ्यंगस्नान म्हणतात. अभ्यंगस्नान करतांना सुगंधी तेल, सुगंधी उटणे लावून स्नान केले जाते व त्यानंतर परमेश्वराची प्रार्थना करतात.


💢 लक्ष्मी पूजन 💢
--------------------
दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्वाचा तो म्हणजे लक्ष्मी पूजन. 

दिवाळीच्या ह्या दिवसाबद्दल एक रोचक कथेचा कटोपनिषद मध्ये उल्लेख आहे. नचिकेत नावाचा एक छोटा मुलगा होता. त्याला असे वाटायचे की मृत्यू देवता यम हे रूपाने अमावस्येच्या काळरात्री सारखे भयंकर असावेत. पण तो प्रत्यक्ष जेव्हा त्यांना भेटला तेव्हा त्यांचा शांत चेहरा व सामान्य रूप बघून आश्चर्यचकित झाला. यमाने नचिकेताला समजावून सांगितले की केवळ मृत्यू ची काळोखी गुहा पार केल्यानंतरच मनुष्य श्रेष्ठ ज्ञानाचा प्रकाश बघू शकतो आणि त्याचा आत्मा परमात्म्यासोबत एकरूप होण्यासाठी देहाचा त्याग करतो. तेव्हाच नचिकेताला सांसारिक आयुष्य आणि मृत्यूच्या महत्वाची जाणीव झाली व तो आपल्या साऱ्या शंकां दूर सारून दिवाळीच्या उत्सवात सहभागी झाला.

ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते. छोट्या छोट्या दिव्यांनी संपूर्ण परिसर उजाळून टाकला जातो आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वीतलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशिर्वादाची लूट करत असते असे मानले जाते सबब सर्वजण लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी तयार असतात. सायंकाळी लक्ष्मी पूजन केले जाते.भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते. ज्या प्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात, त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात.


💢 बलिप्रतिपदा (पाडवा) 💢
--------------------
दिवाळीचा चौथा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. म्हणून या दिवसाला गोवर्धन पूजनाचा दिवस देखील म्हणतात. पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे.


💢 भाऊबीज💢
--------------------
दिवाळी सणाचा पाचवा आणि शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊबीज.

भाऊबीजेची साजरा करण्याचा उद्देश म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला. म्हणून या दिवसाला 'यमद्वितीया' असे नाव पडले. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.

दीपावलीच्या या पाच दिवसाच्या उत्सवात सर्वत्र रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, तसेच दिव्यांचा लखलखाट पाहून खरोखर दीपावली हा प्रकाशमय उत्सव असल्याचे प्रत्ययास येते. याच बरोबर प्रत्येक घरात वेगवेगळे खाद्य पदार्थ, मिठाई तयार केली जाऊन नातलग, मित्रमंडळी यात ते वाटप करून नात्यातील गोडवा कायम ठेवला जातो.


Post a Comment

0 Comments