नाताळ | ख्रिसमस
-----------------------------
नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती धर्मियांचा एक प्रमुख सण आहे. २५ डिसेंबर रोजी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला असल्यामुळे दरवर्षी त्यांचा जन्मदिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण ला एपिफानी म्हणून साजरा करतात. साधारणतः हा सण १२ दिवसांचा असून येशुंच्या जन्मदिवसापासून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. संपूर्ण जगाभरात ख्रिस्ती धर्मीय लोकांचा रहिवास असल्यामुळे हा सण जगभर साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
येशू ख्रिस्तांचा जन्म इस्राईल मधील बेथलहेम या छोट्याशा गावी झाला होता. त्यामुळे ख्रिसमस सणाची सुरुवात याच गावातून होते असे मानले जाते. या दिवशी बेथलहेम येथून लोकं मध्यरात्रीच्या वेळी मिरवणूकीस सुरुवात करतात व जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना विद्युत रोषणाई करून घर सजवले जाते. ख्रिसमस सणाचा एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’. ख्रिसमस ट्री हे नाताळसाठी सजवलेले एक सूचिपर्णी झाड आहे. या झाडाची विद्युत रोषणाई करून सजावट केली जाते, हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. नाताळमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा महत्त्वाची मानली जाते. लहान मुलांचा हा आवडीचा सण असल्याने ते या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. रात्रीच्या वेळी सांताक्लॉज येऊन चिमुकल्यांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी समज त्यांच्यात असते. ख्रिस्ती धर्मीय लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात व सण साजरा करतात. लहान मुलांना काही लोक सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देतात तसेच त्यांना हसवत खेळवत मोठ्या उत्साहाने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत करतात.
नाताळशी संबंधित गाणी हि देखील या दिवसाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नाताळशी संबंधित गाण्यांना कॅरोल्स असे म्हणतात.



0 Comments