श्री क्षेत्र पद्मालय

श्रीक्षेत्र पद्मालय, जळगाव या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर एरंडोल तालुक्यात स्थित असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

पद्मालय हा शब्द ‘पद्म’ आणि ‘आलय’ या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. ज्याचा अर्थ कमळाचे घर असा होतो. मंदिर परिसरात भला मोठा तलाव असून सर्वत्र कमळाच्या फुलांनी तलाव भरलेला आहे. त्यामुळे या ठिकाणास पद्मालय असे नाव देण्यात आले असल्याचे सांगितले जाते. 

पद्मालय येथील श्री गणेश मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांपैकी अर्धे पीठ आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू गणेश मूर्ती आहेत त्यांना आमोद आणि प्रमोद असे म्हणतात. येथील अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा असे दोन स्वयंभू गणपती एकाच सिंहासनावर विराजमान आहेत. हे मंदिर संपूर्णतः दगडांच्या आतील बाजूस बनलेले आहे. मंदिर एका टेकडीच्या वरील बाजूस असून अनेक लहान मंदिरांनी वेढलेले आहे. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत. सदगुरु गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी विश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती झालेली असल्याचेही सांगण्यात येते. 

श्री क्षेत्र पद्मालय येथे मुख्य मंदिराच्या गभऱ्यासमोरच ४४० कि.ग्रॅ. वजनाचा एक भला मोठा दगडी घंटा आहे. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक मोठे दगडी जाते देखील आहे. हे येथील एक अनन्यसाधारण वैशिष्टय म्हणता येईल.




मुख्य मंदिरावर ९० फुटी उंच कळस बांधलेला आहे. मुख्य कळसाभोवती आठ छोटे उप-कळस असून सोन्याच्या पत्र्याने मढवलेले आहेत. दगडी कळसावर यक्ष, किन्नर आणि वीणा वादन करणाऱ्या नारदमुनीं यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या वर दोन भल्या मोठ्या हत्तींचे शिल्प आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधकाम असलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून अतिशय सुंदर व आकर्षक आहे. मुख्य देवालयाच्या चहूबाजूस गणपतीची छोटीछोटी देवळे आहेत. 

उजवी व डावी सोंड असणारे दोन्ही गणेश मूर्ती एकाच व्यासपीठावर विराजमान असणारे हे जगातील एकमेव ठिकाण असल्याचे मानले जाते. तसेच प्रवाळ रत्नापासून बनलेल्या या गणेश मूर्ती अतिशय जागृत असल्याची श्रद्धा असल्याने वर्षभर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी या तीर्थक्षेत्री असते. मुखत्वे करून गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी तसेच गणेश जयंती व गणेशोत्सव काळात येथे भाविकगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.


भीमकुंड
पौराणिक कथांनुसार असे म्हटले जाते की पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा येथील अरण्यात ते राहीले होते आणि दंडकारण्यात तेव्हा बकासूर नावाचा राक्षस राहत होता. तो रोज गावात येऊन प्रत्येकाला मारझोड करून काही माणसांना ठार मारायचा. त्यांच्याकडील सर्व अन्न घेऊन जायचा. म्हणून एक दिवस गावातल्या सगळया लोकांनी ठरविले की, त्या राक्षसाला रोज गाडाभर अन्न, दोन बैल व एक मनुष्य एवढे द्यायचे. म्हणजेच रोज एका घरातून एक माणूस जायचे असे ठरले. कुंती मातेने जेव्हा ही हकीकत ऐकली तेव्हा तीने पांडवांपैकी भीमाला बकासूराचा वध करण्यासाठी पाठविले. भीमाने बकासुरला लढाईत पराभूत करून त्याचा अंत केला. 

आख्यायिकेनुसार लढाई संपल्यानंतर भीमाला तहान लागली होती, ती भागविण्यासाठी भीमाने दगडावर प्रचंड प्रहार केला व त्यातून पाण्याचा प्रवाह निघाला. त्यापासून तयार झालेल्या कुंडालाच भीमकुंड असे नाव पडले. ते भीमकुंड आजही त्याच स्थितीत आपणास या ठिकाणी पाहायला मिळते. भीमकुंड हे पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण गणपती मंदिरापासून अवघ्या 1 किमी अंतरावर आहे. भीमकुंडाकडे जाताना घनदाट जंगल असून पायऱ्यांनी खाली उतरावे लागते. भीमकुंडा जवळच एक महादेवाचे मंदिर तयार करण्यात आलेले आहे. तसेच विविध औषधी वनस्पती या परिसरात आढळतात.


भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर या पक्षांचा वावर देखील या परिसरात असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोरांच्या विणीचा हंगाम असल्याने या काळात मोठ्ठा पिसारा फुलवून नाचणारे अनेक मोर मंदिर परिसरात पाहायला मिळतात. पावसाळ्यात मोराने फुलवलेला पिसारा बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात.

कसे पोहचता येईल ?
-----------------------------
श्रीक्षेत्र पद्मालय हे तीर्थक्षेत्र जळगाव या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे ३० किमी अंतरावर एरंडोल तालुक्यात स्थित असलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. एरंडोल पासून १२ किलोमीटर अंतरावर हे स्थान वसलेले असून येथून एस.टी. बस अथवा खाजगी वाहनाने या ठिकाणी आपण पोहचू शकतो. मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई रेल्वे मार्गावरील म्हसावद रेल्वे स्थानकापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास म्हसावद, धरणगाव व जळगांव ही तीन रेल्वे स्थानके येथून जवळ आहेत. तसेच हवाईमार्गाने प्रवास करत असताना जळगाव व औरंगाबाद येथून जवळची विमानतळे आहेत.



Post a Comment

0 Comments