स्वामी विवेकानंद


“उठा, जागे व्हा आणि ध्येय सिध्दी झाल्याशिवाय थांबू नका.” तरुणांना झोपेतून जागे करणारे हे वाक्य होते महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंदांचे.


जीवनपट
 ◆ जन्म - १२ जानेवारी १८६३, कोलकाता
 ◆ पूर्ण नाव - नरेंद्र विश्वनाथ दत्त
 ◆ आईचे नाव - भुवनेश्वरी देवी
 ◆ वडिलांचे नाव - विश्वनाथ दत्त (वकील)
 ◆ गुरू - रामकृष्ण परमहंस
 ◆ शिकागो धर्मपरिषद - ११ सप्टें १८९३
 ◆ निधन - ४ जुलै १९०२, बेलूर मठ
 ◆ राष्ट्रीय युवक दिवस - १२ जानेवारी
 ◆ आश्रम - रामकृष्ण मठ, वेदांत सोसायटी
 

◆ राष्ट्रीय युवक दिवस - १२ जानेवारी
१२ जानेवारी हा दिवस म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. संपूर्ण भारतात १२ जानेवारी हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी “राष्ट्रीय युवक दिवस” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज विवेकानंदांविषयी सविस्तर माहितीपर हा लेख... खास आपल्यासारख्या वाचकांसाठी..

◆ परिचय आणि बालपण
स्वामी विवेकानंदांचा जन्म कोलकातामधील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवार रोजी पौष महिन्यातील कृष्ण सप्तमीला झाला. विवेकानंदांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी ज्या एक धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांची देवावर प्रचंड श्रद्धा होती. वडील विश्वनाथ दत्त जे कोलकाता उच्च न्यायालयात एक अ‍ॅटर्नी म्हणजेच वकील होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांशी नियमित संबंध येत असल्याने त्यांचा याविषयी गाढा अभ्यास होता. अर्थातच त्यांच्या या ज्ञानामुळे बालपणापासूनच नरेंद्रांवर तार्किक आणि धार्मिक संस्कार झालेत. त्यामुळे विवेकानंद यांनी अत्यंत कमी वयात आध्यात्मिक शिखर गाठले व एक महान तत्वज्ञानी बनले.

लहानपणापासूनच अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले प्रखर आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून स्वामीजींची ओळख निर्माण झाली होती. शिक्षण, तर्क, संगीत अशा विविध क्षेत्रांत ते पारंगत होते. किशोरावस्थेपासूनच ते व्यायाम, खेळ, कुस्ती, मुष्टियुद्ध, लाठियुद्ध त्याचबरोबर पोहणे, होडी चालविणे, घोडेस्वारी अशा साहसी खेळांमध्ये त्यांचा नित्य सहभाग असे. तसेच त्यांना वाचन, गायन आणि वादन इत्यादी छंद देखील होते.

◆ शिक्षण
विवेकानंद यांच्या शिक्षणाची सुरुवात आपल्या घरातूनच झाली. वडील वकील असल्याने त्यांना विविध विषयांचा गाढा अभ्यास होता. त्याचाच फायदा विवेकानंदांना झाला व बालपणीच त्यांच्या शिक्षणाला योग्य दिशा मिळाली.
पुढे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलेल्या मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये १८७१ साली विवेकानंदांनी प्रवेश घेतला. १८७९ मध्ये ते प्रेसिडेन्सी कॉलेजची इन्ट्रान्स एक्झाम (प्रवेश परीक्षा) उत्तीर्ण झाले व कॉलेजला आपला प्रवेश निश्चित केला. काही दिवसांनंतर त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला व तेथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास या विषयांचा गाढा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची तर १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

◆ परमहंसांशी भेट आणि आध्यात्मिक मार्ग
स्वामी विवेकानंद हे लहानपणापासूनच चिकित्सक बुद्धिमत्तेचे असल्याने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ते प्रयत्न करीत असत. लहानपणी आपल्या आईची देवावर असलेली अपार श्रद्धा पाहून त्यांना तेव्हापासून एकच प्रश्न सारखा ग्रस्त करीत होता, तो प्रश्न म्हणजे "देव आहे का?" आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची त्यांना आत्मिक ओढ लागली होती. परंतु या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? यासाठी समर्पक गुरुचा शोध त्यांनी सुरू केला होता. बराच शोध घेतल्यानंतर त्यांची रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली आणि त्यांचा शोध संपला. विवेकानंद यांना वाटले होते की आपण प्रश्न विचारल्यावर गुरू परमहंस काहीतरी उत्तर देतील परंतू तसे झाले नाही. विवेकानंदांनी गुरूंना सरळ विचारले, “देव आहे का?” गुरू रामकृष्ण उठले आणि सरळ विवेकानंद यांना म्हटले “आत्ताच जाणून घेणार का?” आणि असा साक्षात्कार दिला की विवेकानंद आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर जणू त्यांना अनुभवानेच मिळाले.

रामकृष्ण परमहंस यांना भेटल्यानंतर त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. येथूनच त्यांच्या खऱ्या आत्म साक्षात्कारी प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्ण परमहंस यांनादेखील ज्ञान आणि धर्म प्रसार करण्यासाठी विवेकानंदांसारखा एक बुद्धिमान आणि धाडसी शिष्य हवा होता, तो त्यांना मिळाला होता. येथून पुढे विवेकानंदांच्या आध्यात्मिक जीवनाची सुरूवात झाली होती. रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंद यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि तेव्हापासूनच त्यांची स्वामी विवेकानंद म्हणून ओळख निर्माण झाली.

◆ रामकृष्ण मिशन
गुरु रामकृष्ण परमहंस हे कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांनी महासमाधी घेतल्यानंतर विवेकानंदांनी कोलकात्याजवळ वराहनगर भागात आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने रामकृष्ण मठाची स्थापना केली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांचे अस्थीकलश त्या मठात नेऊन ठेवले. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्‍त मठात येऊन राहू लागले. धर्माचा प्रचार करण्यासाठी रामकृष्ण मिशन स्थापित केले. याद्वारे आध्यात्मिक शिकवण शेवटच्या श्वासापर्यंत देण्यात ते यशस्वी झाले.

रामकृष्ण मिशनचे कार्य आणि धर्मप्रसार या उद्देशाने विवेकानंद भारतभ्रमण करण्यासाठी निघाले. भारताची धार्मिक उदासीनता पाहून त्यांचे मन अगदी खिन्न झाले. यादरम्यान भारतीय तरुण जर आध्यात्मिक बनू शकले तर संपूर्ण परिस्थिती बदलू शकते असा त्यांना विश्वास होता. त्यासाठी तरुणांना मार्गदर्शन करणे, देशसेवेसाठी प्रोत्साहित करणे, धर्म जागृती करणे अशी अनेक कार्ये त्यांनी हाती घेतली. 

“उठा, जागे व्हा, ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका.”
तरुणांना झोपेतून जागे करण्यासाठी विवेकानंदांनी जणू आव्हानच केले होते. आणि विशेष म्हणजे तरुणही त्यांच्या पाठीशी उभे राहून देशसेवेसाठी आणि धर्मप्रसारच्या कार्यात सहभागी झाले होते. अनेकांनी विवेकानंदांचे शिष्यत्व पत्करले होते. स्वामीजींच्या विचारांनी तरुण प्रेरित होऊन त्यांच्या कार्यसिद्धी साठी पुढे येत होते. यातच शिकागो येथे होणाऱ्या धर्म परिषदेसाठी स्वामीजी भारताचे प्रतिनिधित्व करणार होते.

◆ शिकागो धर्मपरिषदेतील प्रसिद्ध व्याख्यान
विवेकानंदांना अत्यंत कमी वयात आत्मज्ञान प्राप्त झाले होते, त्यामुळे त्यांना तब्बेत पाहिजे तशी साथ देत नव्हती. म्हणून त्यांनी विलंब न करता भारताबाहेर देखील जगभरात प्रवास सुरू केला. भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता तसेच धर्मज्ञान सर्वत्र पोहचवणे हे उद्दिष्ट स्वामी विवेकानंद यांच्यासमोर होते. अमेरिकेतील शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी सर्व धर्मीय परिषद भरली होती. त्या परिषदेला विवेकानंद उपस्थित होते. वेदांचे ज्ञान असल्याने हिंदू वेदिक धर्माचे ते प्रतिनिधित्व तेथे करीत होते. स्वामीजींनी लेडीज अँड जंटलमेंट ऐवजी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणाची सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या हजारो लोकांनी सुमारे दोन ते अडीच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला. कारण असे आपुलकीचे शब्द तेथे जमलेल्या लोकांनी भाषणाच्या सुरुवातीला प्रथमच ऐकले होते. या परिषदेत विवेकानंदांनी सनातन वेदांतावर आणि भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. सत्याला जाणण्याचे मार्ग आणि धर्म वेगवेगळे आहेत परंतू जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे त्यांनी जगाला सांगितले.

शिकागो संमेलनातील ओल्या जगप्रसिद्ध भाषणानंतर काही काळ ते अमेरिकेत वास्तव्याला होते. तेथे त्यांनी आपल्या विचारांनी आणि व्याख्यानांनी अमेरिकेतील पत्रकार तसेच जाणकार यांचे लक्ष वेधून घेतले. तेथील वृत्तपत्रांनी विवेकानंदांचे वर्णन “भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी”(Cyclonic Monk From India) असे केले होते.  
वेदान्त आणि योग यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अमेरिका, इंग्लंड तसेच इतर युरोपीय देशांमध्येसुद्धा व्याख्याने दिलीत आणि जगाला योगचे देखील महत्व पटवून दिले. १८९५ मध्ये सततच्या प्रवासामुळे व अतिव्यस्ततेमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यानंतर त्यांनी योग वर्ग देण्यास देखील सुरुवात केली.

◆ भगिनी निवेदिता - विवेकानंदांच्या शिष्य
अमेरिकेत शिकागो धर्मपरिषदेत दिलेल्या व्याखानामुळे विवेकानंदांची जगभर चर्चा सुरू झाली होती आणि सर्वत्र त्यांचे कौतुक होत होते. त्यानंतर काही काळानंतर ते युरोपच्या दौऱ्यावर निघून लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला जगभरातून विविध श्रोते उपस्थित राहू लागले होते, त्यातील एक म्हणजे मार्गारेट एलिझाबेथ नोबल. मार्गारेटला स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वविचारांचे अधिकच आकर्षण वाटू लागले होते. एक आदर्श म्हणून ती विवेकानंदांकडे आदराने पाहू लागली होती आणि अल्पावधीतच ती त्यांना आपला गुरू मानू लागली. स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची मार्गरेटची मनापासून इच्छा होती. २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आली. भारतात आल्यानंतर काही काळ कलकत्यात राहून तिने हिंदू चालीरीती, परंपरा समजावून घेतल्या. रामकृष्णांच्या पत्नी माता शारदादेवी यांचे आशीर्वादही तिला या दरम्यान लाभला होता. २९ मार्च १८९८ रोजी मार्गारेटला विवेकानंदांकडून दीक्षा लाभली. विवेकानंदानी दीक्षा दिल्यानंतर मार्गारेटचे नाव भगिनी निवेदिता असे ठेवले. निवेदिता याचा अर्थ होता 'ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली.'

◆ आश्रमांची स्थापना
स्वामी विवेकानंद यांनी आपले धर्मकार्य करीत असताना अनेक आश्रमांची स्थापना केली ज्याद्वारे त्यांना रामकृष्ण मिशनचे कार्य पूर्ण करता आले. त्यामध्ये रामकृष्ण मठ, बेलूर मठ, सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्कमधील वेदांत सोसायटी, कॅलिफोर्निया येथील शांती आश्रम आणि भारतातील अद्वैत आश्रम इत्यादींचा यात समावेश होतो.

◆ ध्यान करीत असताना समाधी
४ जुलै १९०२ रोजी रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास ध्यानसाधनेत बसले असतांनाच त्यांनी समाधी घेतली. स्वामी विवेकानंदांनी आधीच त्यांच्या आयुष्याबद्दल भाकीत केलेले होते की आपण केवळ ४० वर्षे जगणार आणि वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. इतक्या कमी वयात त्यांनी अफाट धर्म कार्य केले. त्यांचे हे कार्य येणाऱ्या पिढ्या सदैव लक्षात ठेवतील यात तिळमात्र शंका नाही. 

◆ विवेकानंदांचे प्रेरक विचार
  • "एखादा मूर्ख जगातील सर्व पुस्तके विकत घेऊ शकतो किंवा ती त्याच्याकडेही असतील, परंतु तो तीच पुस्तके वाचू शकतो जी पुस्तके वाचण्यास तो सक्षम असेल."
  • "खबरदार माझ्या धर्माचे नाव घेतले तर समुद्रात फेकून देईन."
  • “एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना इतर सर्व गोष्टी विसरून आपले सर्व अस्तित्व त्या गोष्टीत ओतून द्या.”
  • "प्रत्येक काम उपहास, विरोध आणि नंतर स्वीकृती या टप्प्यांमधून जावे लागते. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात त्यांच्याबद्दल आत्ता गैरसमज होणे नक्कीच आहे."
  • "आपण आत्ता जे आहोत त्यासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि आपण जे काही बनू इच्छितो ते बनण्याची शक्ती आपल्यात असते."



Post a Comment

2 Comments