तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला.
मकरसंक्रांती हा हिंदू धर्माचा एक महत्वपूर्ण सण असून पौष महिन्यात १४/१५ जानेवारीला साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. "तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला" असे म्हणत आपल्या नातलग, मित्रमंडळींना तिळगुळ वाटून सर्वांना जवळ करून घेण्याचा मकरसंक्रांती हा एक खास सण आहे. नवीन वर्षातला म्हणजेच जानेवारी महिन्यातला हा पहिला सण असतो. दरवर्षी १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती सण साजरा करतात,परंतू काही वेळा सुर्यभ्रमनामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी हा सण १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
◆ तीळ आणि गुळाचे महत्व
तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने जानेवारी महिन्यातील कडाक्याच्या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज पुर्ण करते आणि याच वैज्ञानिक कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झालेली असावी यात शंका नाही.
◆ उत्तरायण व दक्षिणायन
मकर संक्रांत या दिवशी उत्तरायण सुरू होते, असे मानले जाते. परंतु पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण गतीमुळे उत्तरायणाची सुरुवात मागे मागे सरकत आहे. सध्याच्या काळात उत्तरायण मकर संक्रांतीला सुरू न होता २२ डिसेंबर रोजी सुरू झाल्याचे मानले जाते. याच २२ डिसेंबर रोजी उत्तर गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो. या दिवशी सूर्य धनू राशीत प्रवेश करतो. मकरसंक्रांत म्हणजे सूर्याचे मकरराशीत प्रवेश करणे होय (मकर राशीत संक्रमण). वर्षभरात सूर्य कुठल्या ना कुठल्या राशीत प्रवेश करत असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय व प्रसन्न असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो.
उत्तरायण : मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजेच वर जाते. मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सूर्य जातो म्हणजेच तो दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात.
दक्षिणायन : कर्कसंक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ म्हणजेच खाली जाते. कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे सूर्य जातो म्हणजेच तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जातो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात.
दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मृत्यू येणे अधिक चांगले समजले जाते.
◆ मकरसंक्रांती विषयी पौराणीक कथा
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य देव उत्तर गोलार्धात येतो म्हणजेच उत्तरायण होतो. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असे सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना कायमची मुक्ती मिळते. उत्तरायण पर्वाची वाट पहाणार्या भीष्म पितामहांनी 58 दिवस वाट पाहून उत्तरायण सुरू झाल्यानंतरच देहत्याग केला होता.
या संदर्भात एक आख्यायिका आहे, ती अशी की या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील असुरांचा तसेच संकरासुर दैत्याचा वध केला. संक्रांतीच्या दुसर्या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयावर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो, असे मानले जाते.
◆ दान देण्याची प्रथा
सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान तसेच या दिवशी सूर्यदेव, नवग्रह आणि इष्ट देवदेवतांची पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक पुण्य मिळते, असे पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. असे मानले जाते की भगवान सूर्याने शनिदेवाला वरदान दिले होते की वर्षातून एकदा सूर्यदेव शनिदेवाच्या राशीत म्हणजेच मकर राशीत येईल आणि तो शनिदेवाचे घर समृद्ध करेल. मकर राशीत आल्यावर शनिदेवाने सूर्यदेवाची तीळ आणि गुळाने पूजा केली. मकरसंक्रांतीच्या दिवशी शनिदेव आणि सूर्यदेवाच्या प्रसन्नतेच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, धान्य, तीळ, गूळ, गाय, घोडा, सोने आदी सात्विक वस्तू गरजूंना यथाशक्ती दान कराव्यात, अशी परंपरा तेव्हापासून सुरू झाली. आजही अनेक जण मकरसंक्रातीला विविध वस्तू दान करताना आपल्याला दिसतात. परंतु या दिवशी प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वस्तूंचे दान न करता सात्विक वस्तू दान कराव्यात ज्यामुळे दान देणाऱ्या व दान घेणाऱ्या दोन्हीही व्यक्तींना चैतन्य लाभेल.
◆ हळदीकुंकवाचा कार्यक्रम
मकरसंक्रांतीपासुन ते रथसप्तमी पर्यंत अनेक सुवासिनी एकमेकींच्या घरोघरी जाऊन हळदीकुंकवाचे आयोजन करतात. सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात तेजो लहरी अधिक असतात. अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे सुवासिनींसाठी अधिक लाभदायक असते. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा आपण करत असतो. हळदी-कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवनात भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते. तसेच आपापसातील कलह दूर सारून आपल्या जीवनात देखील नवचैतन्य, हर्षोल्हास निर्माण होतो.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनी एकमेकींना वाण देतात. या वाणात सात्विक वस्तूंचा समावेश असणे गरजेचे असते, ज्यामुळे सात्विक ऊर्जेचा संचार होऊन आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण होते. आजकाल अधार्मिक व असात्विक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आपणास दिसते. यात महिला प्रामुख्याने प्लास्टिकच्या वस्तू, स्टीलची भांडी, चामडी वस्तू, पर्स अशा वस्तू देताना आपण पाहतो. परंतु या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण दिल्यास सणाचे महत्व साध्य होऊन योग्य पद्धतीने तो साजरा होऊन फलप्राप्ती होते.
तसेच मकरसंक्रातीच्या दिवशी पंढरपुरच्या रखुमाई अर्थात रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया वाण देण्याकरता गर्दी करतांना दिसुन येतात.
◆ पतंग महोत्सव
बालगोपाळ तसेच तरुण या दिवशी पंतग उडविण्यात व्यस्त असतात. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा देखील खूप प्रसिद्ध आहे. या दिवशी भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव आयोजित केले जातात. याबाबतीत गुजरात राज्य अग्रेसर आहे. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरीता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात. गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी रंगीबेरंगी, विविध आकारात आकाशात उडताना आपल्याला दिसतात. पतंग उडविण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे कडाक्याच्या थंडीत सूर्यकिरणे अंगावर यावीत आणि शरीराला ऊब मिळावी.
◆ शेतीशी मकरसंक्रातीचा संबंध व रथसप्तमी
हा भारतीय सण शेतीशी देखील संबंधीत आहे. मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. त्यामुळे सुर्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते जी रब्बी पिकांसाठी अतिशय महत्त्वाची असते. सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढल्याने पिकांवरील कीड, रोग नष्ट होऊन अधिक उत्पन्न लाभते. भारत एक कृषिप्रधान देश असल्याने या सणाचे महत्व अधिकच आहे. शेतात आलेल्या धान्यांचे वाण सुवासिनी एकमेकांना यादिवशी देतात. मकरसंक्रातीनंतर साधारणत: 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते.
◆ बालकांचे बोरन्हाण
बोरन्हाण हा लहान मुलांवर करण्यात येणारा एक संस्कार आहे. मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्या मकरसंक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांच्या तसेच मित्रमंडळींच्या लहान मुलांना बोलावून हा संस्कार पार पाडतात. मुलाला झबले घालून किंवा धोती कुर्ता घालून त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे त्यावर बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याने तयार केलेले दागिने घालतात.
सर्वप्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे, चॉकलेट आदी पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मस्तकावर टाकलेले पदार्थ मुले खाली झेलतात व वेचून खातात.
त्यानंतर सुवासिनींना हळदी-कुंकू व चहापानाचा कार्यक्रम करतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे मानले जाते. हा संस्कार प्रामुख्याने महाराष्ट्रात प्रचलित असून यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन होते.
मकरसंक्रांती - राज्यनिहाय वेगवेगळी नावे
मकर संक्रांतीशी संबंधित सण हा भारताच्या विविध राज्यात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी या सणाचे नाव वेगवेगळे दिसून येते.
- आसाम - माघ बिहू
- पंजाब - माघी
- हिमाचल प्रदेश - माघी साजी
- जम्मू - माघी संग्रांद किंवा उत्तरायण
- हरियाणा - संक्रत
- राजस्थान - सकरत
- तामिळनाडू - उत्तरायण
- गुजरात - घुघुटी, उत्तरायण
- उत्तर प्रदेश - घुघुटी, खिचडी संक्रांती
- उत्तराखंड - घुघुटी, उत्तरायणी
- बिहार - दही चुरा
- कर्नाटक - पौष संक्रांती
- प. बंगाल - पौष संक्रांती
- गोवा - पौष संक्रांती
- मध्य भारत - सुकरात, पोंगल ,
- दक्षिण भारत - थई पोंगल
- सिंधी लोक - तिरमौरी
◆ इतर देशांत
- नेपाळ - माघे संक्रांती
- थायलंड - सोंगक्रान
- म्यानमार - थिंगयान
- कंबोडिया - मोहन सोंगक्रान
विविध सणांची माहिती, स्पर्धा परिक्षेसंबंधीत नोट्स, परीक्षा प्रक्रिया तसेच इतर दैनंदिन उपयुक्त माहितीसाठी गिरीजा अकॅडमी या संकेतस्थळाला भेट देत रहा. माहिती जास्तीत जास्त शेअर करा. - जगदिश सोळंके
2 Comments
छान माहिती आहे
ReplyDeleteधन्यवाद
Delete